धुळ्याला जाण्यासाठी उबेर कार बुक केली, चालकाला संपवले पण फास्टॅग ने अडकवले!
कल्याण, : धुळे येथे जाण्याच्या बहाणा करीत एक टोळीने कल्याणमधून उबेरची कार बुककरून चालकाची हत्या केली आणि कार देखील चोरून नेल्याची घटना घडली होती. दरम्यान, या टोळीला कल्याण महात्मा फुले पोलीस अटक केली आहे. कारमध्ये लावण्यात आलेल्या फास्टटॅग टोल नाक्यावरील सीसीटीव्हीमुळे कार चोरीचा आणि हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
कार चोरण्याच्या उद्देशाने उत्तरप्रदेश भदोई (Uttar Pradesh Bhadohi) येथून पाच जण 4 ऑगस्टला कल्याणमध्ये आले होते. कल्याण स्थानकात उतरल्यानंतर त्यांनी रात्री 11 वाजेच्या सुमारास कल्याण ते धुळे जाण्यासाठी उबेर कंपनीची कार त्यांनी बुक केली. कंपनीकडून अमृत गावडे कार चालकाला हे भाडे देण्यात आले. अमृतने कल्याणच्या शिवाजी चौकातून या पाच आरोपींना गाडीत बसवून गाडी धुळ्याच्या दिशेने वळवली
.मात्र हत्येच्या तयारी निशी आलेल्या आरोपींनी अमृतच्या गळ्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह दोरीने बांधून तो कसारा घाटात फेकून देत गाडी घेऊन उत्तर प्रदेशच्या दिशेने पळून गेले. मात्र कार मालकाने या गाडीला फास्टटॅग ऑन केलेला असल्यामुळे गाडीने टोल नाका क्रॉस करताच मालकाच्या खात्यातून टोल नाक्याचा चार्ज कापला.
मात्र, काही वेळाने मालकाला गाडी उत्तर प्रदेशमध्ये पोहचल्याचे लक्षात आले. दरम्यान, चालकाचा कोणताही संपर्क होत नसल्याने मालक प्रमोद कुमार गुप्ता याने कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत गाडीसह चालक हरविल्याची तक्रार दाखल केली होती. यात त्याने गाडी उत्तर प्रदेशपर्यंत पोहचल्याची माहिती दिल्याने महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या पथकाने टोल नाल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवून त्याचा ठाव ठिकाणा शोधला.



