महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील मृतांचा आकडा 11 वर, उष्माघाताने घेतला ११ जणांचा बळी, मृतांची यादी जाहीर..
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ऐन उन्हाळ्यात २० लाखांचा जनसमुदाय एकत्रित आणणे सरकारच्या चांगलेच अंगलट आले आहे. रखरखत्या उन्हात खारघर येथील मैदानावर पाच तास बसावे लागल्यामुळे शेकडो श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास जाणवला. अखेर उष्माघाताचा त्रास सहन न झाल्याने ११ श्री सदस्यांचा नाहक बळी गेला आहे. तर नवी मुंबई पनवेल परिसरातील विविध रुग्णालयात उष्माघातामुळे उपचारार्थ दाखल झालेल्या अन्य ४० श्री सदस्यांपैकी चार ते पाच श्री सदस्य अत्यवस्थ आहेत. त्यामुळे न भूतो न भविष्यती असा ठरू पाहणाऱ्या या कार्यक्रमात मृत्यूने तांडव घातल्याचे दिसून आले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री नवी मुंबईतील रुग्णालयात जाऊन श्रीसेवकांची विचारपूस केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या ढिसाळ नियोजनावरून राज्य सरकारवर टीका केली
पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी खारघर येथे आले होते. आपल्या गुरुला सन्मानित करताना याची देही याची डोळा पाहण्यासाठी तब्बल २० लाख श्री सदस्यांची उपस्थिती असल्याचे बोलले जाते. त्या अनुषंगाने शासन यंत्रणेने आयोजनाची सर्व तयारी पूर्ण केली होती. परंतु कार्यक्रमात भर उन्हात श्री सदस्यांना तब्बल सहा-तास बसवून ठेवले. परिणामी कार्यक्रम सुरू असताना ॲम्ब्युलन्सचे सायरन एका मागोमाग वाजू लागले होते. उष्माघाताच्या त्रासामुळे अनेक श्री सदस्य बेशुद्ध होऊ लागले होते. त्यात कार्यक्रम संपण्यास दुपारचे दीड वाजले. त्यानंतर एवढा मोठा जनसमुदाय खारघर परिसरातून बाहेर पडण्यास पुढचे दीड -दोन तास लागले..
मृत पावलेल्या रुग्णांची माहिती सांगण्यास यंत्रणांकडून टाळाटाळ होऊ लागल्याने अनेक नातेवाईक संभ्रमात पडले होते. त्यांना कुठल्याच प्रकारची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे मृतांचा नक्की आकडा किती हे रात्री उशिरापर्यंत यंत्रणांनी स्पष्ट केले नाही. वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात एकूण नऊ रुग्ण दाखल असून त्यापैकी आठ जणांची तब्येत व्यवस्थित आहे. मात्र एक जण अत्त्यवस्थ असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली. अत्यवस्थ असलेल्या त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर उष्माघाताचे उर्वरित रुग्ण हे पनवेल परिसरातील अन्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत.
दरम्यान, रात्री उशिरा ११ मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्रत्येक मृतदेहासोबत एक माणूस व गाडी शासनातर्फे देण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या त्यांच्या गावी त्यांचे नातेवाईक घेऊन जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.
कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन उपचार घेणाऱ्या श्री सदस्यांची विचारपूस केली. मुख्यमंत्री यांनी मयतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखाची मदत सुद्धा जाहीर केली आहे. पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम हा सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत भर उन्हात झाला. या कार्यक्रमात अनेक त्रुटी असल्यामुळे आणि उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे उष्मघाताने या कार्यक्रमात लोकांचा जीव गेला असल्याचे आरोप होत आहे.
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाची वेळ ही स्वत: धर्माधिकारी यांनी दिली होती असे सांगून आपली जबाबदारी झटकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ज्या 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यातील रात्री उशिरा पर्यंत 10 जणांची ओळख पटली आहे. एका महिलेची अद्याप ओळख पटली नसून तिची ओळख पाठविण्याचे काम प्रशासन करीत आहे.
हे सर्व मृतदेह पनवेलच्या नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून, काही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. काही मृतदेह रुग्णालयातच आहेत.
- कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती मृतदेह?
एमजीएम हॉस्पिटलमध्ये 01, भारती मेडिकल हॉस्पिटलमध्ये 02, टाटा हॉस्पिटलमध्ये 08 असे एकूण 11
- मृतांची नावे
1.तुळशीराम भाऊ वागडे वय 58, जांभूळ विहीर ता. जव्हार, 2. जयश्री जगन्नाथ पाटील वय 54, रा. वारळ पो. मोदडी ता. म्हसळा, 3. महेश नारायण गायकर वय 42, रा. मेदडू ता. म्हसळा, 4. मंजुषा कृष्णा भोगडे, रा. भुलेश्वर मुंबई, 5. भीमा कृष्णा साळवे, वय 58, रा. कळवा ठाणे 6. सविता संजय पवार, वय 42, रा. मंगळवेढा, सोलापूर, 7. स्वप्नील सदाशिव किणी, वय 32, रा. विरार, 8. पुष्पां मदन गायकर, वय 63. कळवा, ठाणे, 9. वंदना जगन्नाथ पाटील, वय 62, रा. माडप. ता. खालापूर, 0. कलावती सिद्धराम वायचल, रा. सोलापूर असे 11 अनोळखी आहे.
या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. आज खारघर येथे आयोजित डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघातामुळे काही श्री सदस्यांना रुग्णालयात हलवावे लागले, दुर्दैवाने त्यातील 11 जणांचे उपचार सुरू असताना निधन झाले. ही अतिशय अनपेक्षितपणे घडलेली दुर्देवी आणि वेदनादायी घटना आहे.
या घटनेची माहिती कळताच मी स्वतः कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात तातडीने धाव घेतली. डॉक्टरांशी तसेच उपचार सुरू असणाऱ्या श्री सदस्यांशी बोललो आहे.
या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या श्री सदस्यांच्या परिवारास प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येतील आणि उपचार घेत असणाऱ्या श्री सदस्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनातर्फे केला जाईल असे निर्देश प्रशासनाला आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
रुग्णालयात दाखल काही श्री सदस्यांच्या उपचारांवर मी स्वतः लक्ष ठेवून असून प्रशासन आणि डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. उपचार घेणाऱ्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9987102625



