जळगावात शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटातील दीर्घकालीन राजकीय तणावाला विराम..

जळगाव | गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या राजकीय तणावाला जळगावात विराम मिळाला असून, शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये मनोमिलन घडून आल्याचा चमत्कार घडला आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटातील सामंजस्यासाठी शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला. दोन्ही गटाचे नेते बऱ्याच वर्षांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र आल्याचे पाहून राजकीय वर्तुळातूनही आश्चर्य व्यक्त होत आहे.
मूळ शिवसेनेत फूट पडल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली. साहजिक त्यांच्या सोबत वर्षानुवर्षांपासून असलेले जळगाव ग्रामीणमधील निष्ठावान शिवसैनिक दुखावले गेले. त्याचे पडसाद वेळोवेळी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उमटल्याशिवाय राहिले नाही.
कधीकाळी एकाच पक्षात एकदिलाने काम करणारे दोन्ही गटाचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते एकमेकांना पाण्यात पाहू लागले. हे चित्र नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांपर्यंत कायम असताना, जळगाव ग्रामीणमधील धरणगाव नगर परिषदेत शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा हादरा दिला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली २३ पैकी १५ नगरसेवक शिंदे गटाचे निवडून आले असले, तरी नगराध्यक्षपदावर ठाकरे गटाने शहर विकास आघाडीच्या माध्यमातून बाजी मारली.
- शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मंत्र्यांच्या घरी
धरणगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत २३ पैकी १५ नगरसेवक निवडून आल्यानंतरही आपल्या पक्षाच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडून लढवणाऱ्या उमेदवाराचा पराभव वैयक्तिक मंत्री गुलाबराव पाटील यांना जिव्हारी लागला. त्यामुळे पुढील काळात जळगाव ग्रामीणमधील शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
परंतु, विरोधातूनही विकासाची वाट शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या ठाकरे गटाने मंत्री गुलाबराव पाटील यांना थेट घरी जाऊन नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर मंत्री पाटील यांनीही मोठ्या मनाने आमंत्रण स्वीकारून पदग्रहण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा शब्द दिला. प्रत्यक्षात, नवनिर्वाचित नगराध्यक्षा लिलाबाई चौधरी यांच्या पदग्रहण सोहळ्याला हजेरी लावून मंत्री पाटील शब्दाला जागले.



