आपल खान्देश

नारपार नाहीतर आरपार, संघर्षाच्या पावित्र्यात उत्तर महाराष्ट्र जल परीषद

जल चिंतन बैठकित एकेकाळी सुजलाम सुफलाम असणारी उत्तर महाराष्ट्र भूमी पाण्याविना वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे असे उदगार काढण्यात आले

नारपार नाहीतर आरपार, संघर्षाच्या पावित्र्यात उत्तर महाराष्ट्र जल परीषद…! विकास पाटील

————————-

एकेकाळी सुजलाम सुफलाम असणारी उत्तर महाराष्ट्र भूमी पाण्याविना वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे.- एन.एम.भामरे

धुळे (प्रतिनिधी) उत्तर महाराष्ट्राचं वाळवंट करण्याचा जणू चंगच महाराष्ट्र सरकारने बांधला आहे.उत्तर महाराष्ट्रातील प्रलंबित व प्रस्तावित जलप्रकल्पांवर होणारा अक्षम्य विलंब, अपुरा निधी, लोकप्रतिनिधी व शासनाची अगम्य अनास्था व अतर्क्य चालढकल यांविषयी शासनाला जागं करणेसाठी रविवार दि:२५ जुलै,२०२१ रोजी दुपारी २.०० वाजता उत्तर महाराष्ट्र जलपरीदेच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख अतिथींच्या व पत्रकार बंधुच्या उपस्थित जलचिंतन बैठक पत्रकार भवन,साक्रीरोड,धुळे येथे संपन्न झाली…!

जलचिंतन बैठकीसाठी धुळे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर पाटील यांचं आयोजक म्हणून अतुलनीय योगदान लाभलं. प्रास्ताविकपर भाषणात उत्तर महाराष्ट्र खान्देश मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.विकास पाटील सरांनी उत्तर महाराष्ट्रातील विविध नदीजोड प्रकल्पांविषयी परीषदेची भुमिका व धोरण स्पष्ट केले.हातनूर धरणातील गाळ काढणे,हातनूर धरणापासून डावा कालवा खोदणे,उपसासिंचन योजना कार्यान्वित करणेसाठी सोलरपंप प्रणालीचा वापर करणे,पाडळसरे धरण मुळ प्रस्तावाप्रमाणे बांधणे,नर्मदेचं ११ टीएमसी पाणी तापीत आणणे इत्यादी मागण्यांचा पाठपुरावा करणेसाठी आपण एकत्र आलो आहोत असं ठाम मत मांडलं.वांजुळपाणी संघर्ष समितीचं शिर्षस्थ नेतृत्व तात्यासाहेब मा.श्री.विश्वासराव देवरे यांनी टोपोशीटद्वारे नारपारचं पाणी वांजुळपाणी प्रवाही वळण योजनेद्वारे व बोगद्याद्वारे कमी खर्चात गिरणा नदीत कसं आणता येईल याचं सर्वांगसुंदर मार्गदर्शन केलं.प्राध्यापक श्री.के.एन.अहिरे सर यांनी पेठ-सुरगाणा तालुक्यातील नारपार प्रकल्पात आमच्या हिश्याचं ५० टीएमसी पाणी मांजरपाडा-२ प्रकल्पांतर्गत वांजुळपाणी वळण योजनेचा समावेश करुन कसमादेना व खान्देशसाठी उपलब्ध करुन द्यावं असं आग्रही मत मांडलं.

प्रमुख अतिथी म्हणून शहादा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष तात्यासाहेब मा.श्री.मोतीलाल फकीरा पाटील यांनी भुजल पातळी वाढविण्यासाठी ३५ किमी लांबीच्या गोमाई नदी नांगरणीच्या क्रांतीकारी प्रयोगाचं फलीत सोदाहरण स्पष्ट केलं.भुजल पातळी वाढविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व नद्या नांगरणी करण्याचा उपक्रम राबविल्यास नदी परीसरातील सर्व विहिरी व बोअरवेल जिवंत होतील.कदाचित पाण्यासाठी धरणं बांधण्याची गरजही उरणार नाही. असं अनुभवसिद्ध मत प्रदर्शित केलं.वांजुळपाणी संघर्ष समितीचे सदस्य प्राध्यापक श्री.अनिल निकम सर,श्री.देवा पाटील यांनी वांजुळपाणी प्रकल्पाची गरज आणि महत्व अधोरेखित केलं.गावोगावी प्रसार,प्रचार,जनजागृती व उभारलेला लढा याचा इतिहास डोळ्यासमोर उभा केला.पाडळसरे धरण संघर्ष समितीचे नेते नरेंद्र पाटील,सुभाष चौधरी, पत्रकार श्री.रणजित शिंदे,प्राध्यापक श्री.सुनील पाटील यांनी पाडळसरे धरणासाठी केलेला अविश्रांत व अथक संघर्ष करुन आतापर्यंत शासनाकडून १३५ कोटी रुपये मिळविल्याचं समाधान व्यक्त केलं.आणि पाडळसरे धरण प्रकल्प प्रधानमंत्री जलसिंचन योजनेकडे वर्ग केल्यास धरण नियोजित काळात पुर्ण करता येईल असं सुचवलं.आणि पुढची सहविचारसभा पाडळसरे धरण स्थळी घेण्याचं सूतोवाच केलं. परीषदेचे कार्यवाह श्री.भिला पाटील यांनी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनद्वारे नदीजोड प्रकल्पांच्या सांख्यिकीय माहितीचा खजानाच श्रोत्यांसमोर उलगडून दाखविला.डॉ. एच.एम.पाटील यांनी धडगाव परीसरात पाणी टंचाई वर मात करणेसाठी,जायंट्स ग्रुप व समाजिक संस्थांच्या मदतीने,महाविद्यालयीन विद्यार्थी व ग्रामस्थांच्या श्रमदानातून जलबंधा-यांची उभारणी कशी केली आणि त्याची फलश्रुती आपल्या मनोगतातून सादर केली.सदर परीषदेतील उपस्थित मान्यवरांचं गुलाबपुष्प देवून यथोचित स्वागत उत्तर महाराष्ट्र खान्देश मंडळाचे खजिनदार आदरणीय अप्पासाहेब  श्री.ए.जी.पाटील,सचिव दिपक पाटील, बाळासाहेब ह्याळीज, श्री.जी.ओ.माळी, श्री.सतीश पाटील, श्री.लिलाधर सोनार, श्री.किशोर पाटील, श्रीमती अनिताताई सैंदाणे,सौ.कामिनी पाटील, डॉ.एच.एम.पाटील यांनी केलं.जलचिंतन बैठकीनिमित्त जलपरीषदेने आजपर्यंत केलेल्या कार्यवाही चा, पत्रव्यवहाराचा, संपर्काचा लेखाजोखा परीषदेचे कार्याध्यक्ष श्री.एन.एम.भामरे यांनी सादर केला. उत्तर महाराष्ट्र खान्देश मंडळाचे कार्याध्यक्ष मा.श्री.बापुसाहेब हाटकर यांनी जलसंपन्न परीसर आणि जलसाक्षर पिढी तयार करणं महत्वाचं आहे.गावोगावी पोहोचण्यासाठी जलयात्रांचं आयोजन गरजेचं आहे. लढा आणि आंदोलनाशिवाय पर्याय नाही.सरकारला तीच भाषा कळते त्यामुळे आपण सर्वांनी गावागावातून किमान १० लोकांशी संपर्क केल्यास परीषदेसाठी लाखभर लोकांचं संख्याबळ निर्माण करता येईल असं सुचवलं.

 डॉ. माधवराव चितळे समितीच्या अहवालानुसार नारपार,गोदावरी व गिरणाच्या खो-यात ५० टीएमसी व इतर भागात १०० टीएमसी पाणी उपलब्ध असतांना देखील नाशिक जिल्ह्यातील कसमादेनां पट्टा,जळगांव जिल्ह्यातील चाळीसगांव,भडगांव,पाचोरा,पारोळा,एरंडोल,धरणगाव  व, अमळनेर आणि धुळे जिल्ह्यांतील काही गावांना जाणीवपुर्वक पाण्यापासून वंचित ठेवण्याचा घाट घातला जातोय.

उत्तर महाराष्ट्राच्या हक्काचं आणि हिश्याचं पाणी मराठवाड्यातील गोदावरी खो-यासाठी २५.५५ टीएमसी, मुंबईसाठी ३१.६० टीएमसी आणि अतीतुटीच्या गिरणा-तापी खो-साठी फक्त १०.७६ टीएमसी पाणी वाटपाचा शासनाचा निर्णय कसमादेना व खान्देशवर घोर अन्याय करणारा,समन्यायी तत्वाला तिलांजली देणारा,धुळफेक करणारा,अधिकार व हक्क नाकारणारा असा तुघलकी निर्णय आहे.आणि हा काळा निर्णय उत्तर महाराष्ट्र जल परीषद,वांजुळपाणी संघर्ष समिती,पाडळसरे धरण संघर्ष समिती हाणून पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.प्रसंगी रस्त्यावर उतरुन तीव्र संघर्ष करु,लढा उभारु,आंदोलन करु,शासनाचं मत परीवर्तन करु…!

नारपारचं संपुर्ण पाणी मांजरपाडा-१ च्या माध्यमातून छलकपटाने,साम,दाम,दंड,

भेद नीतीने मराठवाड्याकडे वा मुंबई कडे वळविणे म्हणजे उत्तर महाराष्ट्रासाठी मात्र भाकर उशाला पण कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण होणार आहे.गिरणा-मोसम-बोरी-पांझरा-तापी खो-यासाठी किमान ५० टीएमसी पाणी उपलब्ध करुन देणं शासनाचं नुसतं कर्तव्यच नव्हे तर जबाबदारीही आहे.यासाठी उत्तर महाराष्ट्र जल परीषदेने कंबर कसली आहे.सन्माननीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब, सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब,केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार,सन्माननीय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.श्री.अजीतजी पवार साहेब ,जलसंपदामंत्री श्री.जयंत पाटील साहेब, पालकमंत्री,केंद्रीय जलमंत्री,उत्तर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार व आमदार महोदयांना प्रत्यक्ष भेट घेवून परीषदेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमार्फत जलचिंतन बैठकीतील ठरावांचं निवेदन आगामी काळात देण्याचं ठरलं…!

पत्रकार परीषदेत पत्रकार बंधुच्या सर्व प्रश्नांना व जलचिंतन बैठकीचा हेतू व आगामी ध्येयधोरणे व दिशा काय? यांवर सन्माननीय परीषदेच्या सूत्रधारांनी समयोचित,सविस्तरपणे व मुद्देसूद उत्तरे दिली.त्यामुळे पत्रकार परीषद अतिशय मनमोकळ्या आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली.सूत्रसंचालनाची धुरा जलपरीषदेचे कार्याध्यक्ष श्री.एन.एम.भामरे व आभारप्रदर्शनाची जबाबदारी उत्तर महाराष्ट्र खान्देश मंडळाचे सचिव श्री.दिपक पाटील यांनी उत्तमरीतीने सांभाळली.जलचिंतन बैठक अत्यंत यशदायी आणि संस्मणीय ठरली…!

शब्दांकन-श्री.एन.एम.भामरे.(कार्याध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र जल परीषद)

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे