आगरतळा : भाजपची (BJP) सत्ता असलेल्या त्रिपुरा राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने इतिहास रचला आहे. डाव्या पक्षांचा गड असलेल्या त्रिपुरात भाजपने आपले स्थान आणखी मजबूत केलं आहे. डाव्यांसह तृणमूल काँग्रेसशी लढताना भाजपने ३३४ पैकी ३२९ जागा काबीज केल्या आहेत. त्यापैकी तब्बल ११२ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, आगरतळा महापालिकेतील सर्वच्या सर्व ५१ वॉर्डांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसह तृणमूल व डाव्यांनाही इथे खातेही उघडता आले नाही. अगरतलासह सहा नगर पंचायत आणि १३ नगर परिषदांमध्येही भाजपचाच डंका आहे. डाव्यांना केवळ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. तर पहिल्यांदाच त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरलेल्या तृणमूलला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे भाजपच्या विजयी उमेदवारांचा आकडा ३३४ पैकी ३२९ एवढा झाला आहे.
२०१८ मध्ये राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजप पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे गेले आहे. त्यामुळे २०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याचे बोलले जात होते. या निवडणुका लक्षात घेता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा