पुण्यानंतर जळगावच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातही बिल्डरचा मुलगा संशयित; नेमकं प्रकरण काय?
जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे एका गाडीने चार जणांना धडक दिली होती. यामध्ये चौघांनाही मृत्यू झाला. पुण्यामध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणानंतर ही घटनाही प्रकाशझोतात आली. आरोपींमध्ये बड्या लोकांचा समावेश असल्याने पोलीस कारवाईसाठी दिरंगाई करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. हे दोन्हीही मुले बिल्डर आणि नेत्याची मुलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ही घटना 7 मे रोजी घडली होती. १६ दिवसानंतर जळगाव पोलिसांनी बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार यांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, त्या दोघांवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि दोघांना घेऊन ते जळगावच्या दिशेने रवाना झाले. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची चर्चा होती.
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील रहिवासी असलेल्या राणी सरदार चव्हाण (वय २६ वर्षे) या आशासेविका होत्या. रामदेववाडी गावामध्ये त्या सेवा बजावत होत्या. ७ मे रोजी संध्याकाळी त्या मुलगा सोहम (७ वर्षे), सोहमेश (४ वर्षे) आणि १६ वर्षाचा भाचा असे चौघे गाडीने घरी जात होते. रामदेववाडी गावाच्या पुढे घाटमार्गावर जळगावकडून येत असलेल्या मोटारीची त्यांना जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चक्काचूर झाला. तसेच, चौघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी आरोपी फरार झाले होते. तर, गाडीमध्ये गांजा सापडल्याचीदेखील माहित देण्यात आली होती. यावेळी घटनास्थळी ग्रामस्थ जमा झाले होते. पोलिसांनी धडक देणार्या तरुणांची बाजू घेतल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आणि तोडफोड, दगडफेकही केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते



