अहमदनगरचे नाव अहिल्यानगर; अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
आता या दोन शहरांनंतर अहमदनगरचंही नामांतर होणार आहे. नामांतराचा हा प्रस्वात आता मंत्रिमंडळात ठेवला जाईल..
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashloka Ahilya Devi Holkar) यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहमदनगरच्या चौंडी येथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गोपीचंद पडळकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे असे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना राम शिंदे यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याची मागणी केली. गोपीचंद पडळकर यांनीदेखील याबाबत मागणी केली. त्यानंतर आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केले जाणार, अशी घोषणा केली. तसेच आपल्या सरकारच्या कार्यकाळात अहिल्यानगर (Ahilyanagar) नाव होणे हे आमचे भाग्य आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव | चौंडी, अहमदनगर https://t.co/QnTmu5p0W9
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 31, 2023
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव लगेच मान्य केला. राजमाता अहिल्यादेवी होळकर नसत्या तर काशी राहिली नसती. त्या नसत्या तर शिवाची मंदिरे आपल्याला बघायला मिळाली नसती. त्या नसत्या तर दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आज जो आमचा धर्म जिवंत आहे, तो धर्म जिवंत राहिला नसता. अशा प्रकारचे कार्य या राजमातेने करुन दाखवले. त्यामुळे जी मागणी होतेय की, या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिले पाहिजे, मी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विनंती करत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीसांनी केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आहिल्यादेवींचे माहेरचे आडनाव शिंदे आहे आणि मी पण शिंदेच आहे. आज येथे रामभाऊ शिंदे आणि गोपीचंद पडळकर यांनी मागणी मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझीही तीच इच्छा आहे. तसेच तुमच्या सर्वाच्या इच्छेखातर अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहिल्यादेवी होळकर नगर असं करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आहिल्यादेवींचे कर्तृत्व हिमालयाएवढे आहे. त्यामुळे या अहमदनगरला त्यांचे दिले जाणार आहे. हा निर्णय आमच्या सरकारच्या काळात घेतला जात आहे हे आमचे भाग्य आहे.
दरम्यान, याआधी राज्य सरकारने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नामांतर धाराशिव केले होते. आता या दोन शहरांनंतर अहमदनगरचंही नामांतर होणार आहे. नामांतराचा हा प्रस्वात आता मंत्रिमंडळात ठेवला जाईल आणि याबाबत केंद्र सरकारला कळवले जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी झाल्यानंतर अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर होईल.



