ब्रेकिंग

महाराष्ट्र हीच हिंदुत्वाची मूळ भूमी, येथून तोतयांचे व्यापारी हिंदुत्व संपवा; उद्धव ठाकरेंचे गणरायाला साकडे..

मुंबई (वृत्तसेवा) राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर बाबा रामदेव यांनी गणरायांच्या आगमनाच्या एक दिवसांपूर्वी मुंबईत येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर बाबा रामदेव यांनी ‘शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे मानस, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत’, असे विधान केले होते. त्यांच्या याच विधानांवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनातील रोखठोक सदरातून बाबा रामदेव यांना खडेबोल सुनावले आहेत.

बाबा रामदेव यांनी एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी म्हटलं. त्यानंतर आता सामनातील रोखठोक सदरात बाबा रामदेव यांना थेट तोतया व्यापारी संत म्हणत लक्ष्य करण्यात आलं आहे. “महाराष्ट्र हीच हिंदुत्वाची मूळ भूमी. वीर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पहिले सरसंघचालक येथेच निर्माण झाले. त्या महाराष्ट्रात तोतयांचे हिंदुत्व मखरात बसवून पालखीत मिरवले जात आहे. पालखीचे भोई कोण हे काय श्री गणेशाला माहीत नाही. रामदेव बाबा नावाचा एक तोतया व्यापारी संत गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येस मुंबईत अवतरला व त्याने जाहीर केले, ‘मुख्यमंत्री शिंदे हेच हिंदुत्वाचे गौरव पुरुष असून शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारसदार आहेत!’ बाबा रामदेवांची ही विधाने म्हणजे संतपदास डाग आहे”, असं टीका रोखठोकमधून करण्यात आली आहे.

बाबा रामदेव यांनी केलेलं विधान हे भाजपचं असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. भाजप एखादा नाट्यप्रवेश रचतो व त्यानुसार पात्रे रंगमंचावर येतात व डायलॉग बोलून जातात. उद्या हे तोतया बाबा कश्मीरात जाऊन गुलाम नबी आझादांना भेटतील व जाहीर करतील, ‘तुम्हीच खरे राष्ट्रपुरुष व गांधी नेहरूंचे वारसदार! राहुल गांधी सत्तेवर येत आहेत अशी चाहूल या बाबा लोकांना झाली तर ते सोनिया गांधींना राष्ट्रमाता व राहुलना नवे पंडित नेहरू म्हणून घोषित करतील, अशा शब्दात बाबा रामदेव यांना खडेबोल सुनावले आहेत.

श्री गणेशाच्या उत्सवात हे असे चमचेगिरीचे ‘मेळे’ महाराष्ट्र खपवून घेणार नाही. कधीतरी याच बाबाने ‘मातोश्री’वर येऊन उद्धव ठाकरे यांनाही हिंदुत्वाचे खरे तारणहार असे प्रमाणपत्र बहाल केले होते. पण हेच बाबा दिल्लीतील एका आंदोलनात मध्यरात्री ‘साडी-चोळी’ घालून मुलींच्या पंजाबी वेशभूषेत पळून गेले होते. हे भगोडे महाराष्ट्रात येऊन पळपुट्यांना हिंदुत्ववीरांच्या पदव्या बहाल करतात हा महाराष्ट्राचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे, अशी टीका बाबा रामदेव यांच्यावर रोखठोकमधून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील या बाबागिरीचा जादुटोणा या गणेशोत्सवात नष्ट व्हावा. श्री गणेश हा लढणाऱ्यांचा सेनापती. न्याय देणाऱ्यांचे दैवत. श्री गणेशाच्या कृपेने महाराष्ट्र लढत राहील, न्यायाचे रक्षण करील. श्री गणेशचरणी महाराष्ट्राचा हाच नवस आहे!, असेही रोखठोकमधून उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे