आरोग्य व शिक्षणदेश-विदेश
कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या मात्रांचा 20 कोटीचा टप्पा भारताने केला पार
कोविड – 19 लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून 130 दिवसात भारताने गाठला हा मैलाचा टप्पा ,हा टप्पा गाठणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश ,60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 42 टक्के लोकसंख्येला कोविड -19 लसीची किमान एक मात्रा प्राप्त
कोविड -19 लसीकरण मोहिमेत आज भारताने महत्त्वाचा मैलाचा टप्पा गाठला आहे. आज सकाळी 7 वाजता प्राप्त आकडेवारीनुसार मोहिमेच्या 130 व्या दिवशी भारतातील कोविड लसीकरणाने 20 कोटींचा टप्पा (एकूण 20,06,62,456 मात्रांपैकी 15,71,49,593 पहिली मात्रा तर 4,35,12,863 दुसरी मात्रा ) पार केला आहे.
भारतातील कोविड -19 लसीकरण मोहीम जगातली आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम असून तिची सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते 16 जानेवारी 2021ला झाली आहे.
केवळ 130 दिवसात हा टप्पा गाठणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश आहे. अमेरिकेने 124 दिवसात 20 कोटींचा टप्पा पार केला होता.
याशिवाय ‘अवर वर्ल्ड इन डेटा’ आणि इतर वृत्तांनुसार कोविड – 19 लसीकरणातील आघाडीच्या देशांमध्ये ब्रिटनने 168 दिवसात 5.1 कोटींचा टप्पा पार केला. ब्राझीलने 128 दिवसात 5.9 कोटी तर जर्मनीने 149 दिवसात 4.5 कोटी लसींचा टप्पा गाठला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत 45 वर्षांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 34 टक्के व्यक्तींना कोविड -19 प्रतिबंधक लसीची किमान 1 मात्रा मिळाली आहे. त्याचप्रमाणे भारतातील 60 आणि त्या वर्षांवरील व्यक्तींपैकी 42 टक्क्यांहून अधिक जणांना कोविड – 19 लसीची किमान 1 मात्रा मिळाली आहे.



