पाचोरा स्थानकावर पंजाब मेल, विदर्भ एक्स्प्रेसला थांबा द्या..!

जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना नाशिक, कल्याण, ठाणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाण्यासाठी सोयीची ठरणारी भुसावळ–मुंबई ही पॅसेंजर करोना काळापासून बंद आहे. ही पॅसेंजर गाडी तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी पाचोरा येथील प्रवासी कृती समितीने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ–मुंबई मार्गावर सध्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. मात्र, करोना काळात बंद करण्यात आलेली भुसावळ–मुंबई पॅसेंजर गाडी अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. ही गाडी पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा जळगाव जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना आहे. भुसावळहून मुंबईकडे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या धावत असल्या, तरी त्या प्रामुख्याने मोठ्या स्थानकांवर थांबतात. भुसावळ–इगतपुरी आणि भुसावळ–देवळाली या दोन मेमू गाड्या सोडल्या, तर भुसावळ ते मुंबई दरम्यानच्या लहान स्थानकांवर प्रवाशांना चढ-उतारासाठी कोणतीही गाडी उपलब्ध नाही. यामुळे भुसावळ, जळगाव तसेच परिसरातील प्रवाशांना नाशिक, इगतपुरी किंवा त्यापुढील स्थानकांवर जाण्यासाठी मोठ्या जंक्शनवर जाऊनच गाडी पकडावी लागते.
मध्य रेल्वेच्या भुसावळ–मुंबई मुख्य मार्गावर असलेले पाचोरा हे एक महत्त्वाचे जंक्शन असून परिसरातील हजारो प्रवासी तेथून दररोज येथून प्रवास करतात. मात्र, फिरोजपूर ते मुंबई धावणारी पंजाब मेल तसेच गोंदिया ते मुंबई धावणारी विदर्भ एक्स्प्रेस गाड्यांना पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबा नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांना मोठी गैरसोय सहन करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रवासी कृती समितीने पाचोरा स्थानकावर पंजाब मेल व विदर्भ एक्स्प्रेसला थांबा दिल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होईल. तसेच या परिसराच्या सामाजिक व आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असे भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या निदर्शनास आणून दिले. आणि इतर अनेक मागण्या विविध गाड्यांचे स्टॉप व स्टेशनवरील सोयी सुविधा या संदर्भात डी आर एम यांची भेट घेऊन त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.
यावेळी प्रवासी कृती समितीचे सुनील शिंदे, भरत खंडेलवाल, प्राध्यापक मनोज बाविस्कर, अँड. अविनाश भालेराव, संजय जडे, अनिल येवले, शहबाज बागवान, शशिकांत मोरे, खंडू सोनवणे, दीपक दांडगे, दीपक वारुडे आदी पदाधिकारी हजर होते.




