Farmer Subcidy Scam | शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणी दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करा..
पाचोरा तालुक्यातील शेतकरी अनुदान योजनेंतर्गत तब्बल रु. 1 कोटी 20 लाख 13 हजार 517 इतक्या प्रचंड रकमेचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी, तरुणांसाठी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी दिलेला निधी संगनमताने बेकायदेशीर पद्धतीने काही अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वळवला त्यावर त्वरित कारवाई व्हावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.
पाचोरा तहसील कार्यालयातील संगणकीय प्रणालीवरील लॉगिन आयडी व पासवर्ड हे केवळ तहसीलदारांच्या जबाबदारीत असतात. मात्र या आयडीचा बेकायदेशीर वापर करून शेतकऱ्यांच्या नावे बनावट अभिलेख तयार करण्यात आले व शासनाच्या अनुदान रकमेचा अपहार करण्यात आला. चौकशीत महसूल सहाय्यक अमोल भोई व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. या दोघांनी बनावट शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड व बँक पासबुक सादर करून अर्ज दाखल केल्याची नोंद आहे.शासनाच्या प्रणालीचा गैरवापर करताना संबंधित अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून कर्तव्यकठोरता टाळली. यामुळे त्यांची प्रशासकीय व फौजदारी जबाबदारी निश्चित होते.
या प्रकरणात विद्यार्थ्यांची वैयक्तिक कागदपत्रे देखील बेकायदेशीरपणे वापरण्यात आली आहेत. परिणामी अनेक विद्यार्थी व महिला नागरिक मानसिक तणावाखाली गेले आहेत. एवढेच नव्हे तर ज्यांनी कधीही पैसे घेतले नाहीत, त्यांच्याकडून बेकायदेशीर पद्धतीने वसुलीची घाई केली जात आहे. काहींची बँक खाती कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय सील करण्यात आली आहेत.
या घोटाळ्यामुळे पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये व समाजामध्ये तीव्र रोष पसरला आहे.
सदर प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालेला असून तो जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे सखोल तपास करून दोषींना शिक्षा व अपहाराची वसुली होणे अत्यावश्यक आहे.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत,
पाचोरा तहसीलदार यांना प्रकरणातील मुख्य आरोपी मानून तातडीने निलंबित करावे. विभागीय स्तरावर शासकीय उच्चस्तरीय ऑडिट चौकशी त्वरित सुरू करावी. महसूल सहाय्यक अमोल भोई व प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांच्यासह सर्व दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करून अपहाराची संपूर्ण वसुली करावी, निर्दोष शेतकरी, विद्यार्थी व महिला नागरिक यांना झालेल्या मानसिक, आर्थिक व सामाजिक त्रासाची भरपाई देण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी. असे निवेदन देण्यात आले.
मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या नेतृत्वात मनसे शहराध्यक्ष ऋषिकेश भोई यांनी निवेदन दिले त्यावेळी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे जिल्हा संघटक शुभम पाटील मनविसे जिल्हाध्यक्ष कृष्णा दुंदुले मनविसे शहराध्यक्ष निलेश मराठे वाल्मीक जगताप जितेंद्र नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते



