आपल खान्देशब्रेकिंग

दी पाचोरा पिपल्स बँकेच्या निष्ठावंत सभासदांचा आवाज, निलेश विनायक मराठे यांची उमेदवारी म्हणजे स्वाभिमानासाठीचा लढा…!

 

पाचोरा तालुक्याच्या आर्थिक आणि सहकारी चळवळीच्या इतिहासात दि पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड हे नाव अभिमानाने उच्चारलं जातं. एका विचाराने आणि तत्त्वांवर उभी राहिलेली ही बँक म्हणजे केवळ आर्थिक व्यवहारांची संस्था नाही, तर संपूर्ण परिसरातील जनतेच्या स्वप्नांना दिशा देणारी, त्यांच्या गरजा समजून घेत उभी राहिलेली आर्थिक चळवळ आहे. 

पाचोरा पिपल्स बँक उभी करताना अनेकांनी आपल्या मेहनतीचे पैसे, विश्वास, आणि निष्ठा अर्पण केली. त्याच सुरुवातीच्या काळातील ५१ रुपयांचे शेअर्स घेणाऱ्या सभासदांनी आपले जीवन समर्पित केले. बँकेच्या सुरुवातीच्या वाटचालीत अनेक अडचणी आल्या, अनेक संकटे कोसळली, पण त्यांच्याच हिमतीच्या बळावर, त्यांच्याच सहकार्याने आणि त्यांच्याच आधारावर पाचोरा पिपल्स बँकेच्या रोपट्याने वटवृक्षाचे रूप घेतले, परंतु आज, हीच संस्था आपल्याच मुळांपासून तोडली जात असल्याची हुरहूर निष्ठावान सभासदांच्या मनात आहे. संस्थेच्या कारभारात सहकार नाही, तर व्यावसायिकता आल्याने खंत निर्माण झाली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर निलेश विनायक मराठे यांनी बँकेच्या निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर करून एक नवसंजीवनी देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

पाचोरा पिपल्स बँक सुरू होत होती, तेव्हा त्यामागे कुणी मोठे भांडवलदार नव्हते. होते फक्त सामान्य सभासद, ग्रामीण जनता, छोटे व्यावसायिक, शेतकरी, दुकानदार — जे आपल्या कष्टातून मिळालेल्या पैशातून बँकेच्या रोपट्याला पाणी घालू लागले. ५१ रुपये देऊन शेअर घेतलेली माणसं हे केवळ गुंतवणूकदार नव्हते, तर ते या संस्थेचे खरे शिल्पकार होते. याच सभासदांनी बँकेच्या कारभारात सहकार्य दिलं. त्यांनी पतसंस्थांना वेळेत परतफेड केली, कर्जवसुलीला प्राधान्य दिलं, आणि आपली संस्था मजबूत होण्यासाठी कोणताही स्वार्थ न बाळगता झटले. आज बँकेच्या शाखा वाढल्या, आर्थिक उलाढाल कोटींमध्ये पोहोचली, नाव खऱ्या अर्थाने “वटवृक्ष” झालं — पण ज्यांच्या बळावर ही उंची गाठली, त्या सभासदांचं काय ?

यावेळी पिपल्स बँकेच्या कारभारात स्वाभिमान, पारदर्शकता, व सहकार्य यांचा शिरकाव होता, तेव्हा ही बँक “जनतेची बँक” म्हणून ओळखली जात होती. पण अलीकडच्या काळात झालेला व्यवसायिक पध्दतीचा अतिरेक, निर्णयप्रक्रियेतून सर्वसामान्य सभासदांना दूर ठेवणे, नव्या नितीधोरणात मूळ सभासदांची घोर उपेक्षा, हे या संस्थेच्या आत्म्यालाच विसरून जाण्यासारखे ठरत आहे. ज्यांनी ५१ रुपये भरून झाड लावलं, त्यांना आज मतदानाचा हक्कच नाकारण्यात आला! नवीन नियमांनुसार १००० रुपयांचे शेअर्स घेतलेल्यांनाच मतदानाचा अधिकार दिला गेला. हा बदल केवळ नियमांचा नव्हे, तर तो संस्थेच्या मूळ तत्त्वांना डावलण्याचा आणि जुन्या सभासदांचा अपमान करणारा आहे.

स्थानिक तरुण-तरुणींनी या संस्थेच्या यशातही मोठा वाटा उचललेला आहे. परंतु जेव्हा बँकेत नोकऱ्यांची भरती झाली, तेव्हा गावकऱ्यांच्या, संस्थेच्या शेतकरी–श्रमिकांच्या घरातल्या पोरांना संधी नाकारली गेली. बाहेरच्या जिल्ह्यातील, बाहेरच्या मंडळींना प्राधान्य दिलं गेलं. ही भरती केवळ अपारदर्शक नव्हे, तर सामाजिकदृष्ट्या अन्याय करणारी होती.हे बघून स्वाभिमानी मतदारांच्या मनात असंतोष उफाळून आला आहे. ही संस्था काही मोजक्यांची खासगी मालमत्ता नाही. ही संस्था उभी राहिली आहे जनतेच्या पैशावर, विश्वासावर आणि त्यागावर! मग मग त्यांनाच न्याय न मिळणं ही सर्वसामान्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे. 

या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर निलेश विनायक मराठे यांची उमेदवारी ही केवळ निवडणूक लढवण्यापुरती मर्यादित नाही. ती एक वैचारिक लढाई आहे. ती स्वाभिमान परत मिळवण्याची सुरुवात आहे. त्यांनी नेहमीच समाजात वावरणाऱ्या सर्वसामान्यांच्या बाजूने उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या वडिलांचेही पिढ्यानपिढ्या सहकार चळवळीत योगदान आहे.

“पिपल्स बँकेला पुन्हा एकदा सहकाराचा, पारदर्शकतेचा आणि माणुसकीचा चेहरा मिळवून देणं” हेच त्यांच्या निवडणुकीतून ध्येय आहे. 

उमदेवार निलेश मराठे यांचा हेतू हा संस्थेचा पाया पुन्हा मजबूत करणे आहे — जेणेकरून नवीन तरुणांनाही संधी मिळेल, पण ती स्थानिकांची प्राथमिकता जपतच. त्यांनी जाहीर केलं आहे की, ते सर्व जुने सभासद पुन्हा सक्रिय व्हावेत यासाठी प्रयत्न करणार, सभासदांना समान अधिकार मिळावा यासाठी नियमावलीत बदल घडवून आणणार, नोकर भरतीमध्ये पारदर्शक प्रक्रिया राबवणार, आणि शेअरधारकांना केवळ आर्थिक लाभच नव्हे तर सन्मानही मिळावा यासाठी काम करणार. 

निलेश विनायक मराठे यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, “ही केवळ निवडणूक नाही, तर सहकाराला पुन्हा आत्मा देण्याची वेळ आहे.” त्यांनी सर्व स्वाभिमानी मतदारांना आवाहन केलं आहे, “ज्यांनी ५१ रुपयांचे रोपटं लावलं, ज्यांनी त्यात प्रेमाने पाणी घातलं, आणि त्याला सावली दिली… आज त्यांचाच हक्क हिरावला जात आहे. आता वेळ आली आहे — संस्थेवर पुन्हा आपला अधिकार प्रस्थापित करण्याची, आता वेळ आली आहे — पिपल्स बँकेला पुन्हा ‘जनतेची बँक’ बनवण्याची सहकाराची खरी ताकद म्हणजे माणसं, नाती आणि विश्वास. याच विश्वासावर बँका निर्माण होतात. परंतु जेव्हा संस्थेचा कारभारच माणसांपासून दूर जातो, तेव्हा बुडणं अपरिहार्य होतं. अशा स्थितीत निलेश मराठे यांच्यासारखा नेतृत्वप्रवृत्तीचा, संयमी, अभ्यासू, आणि न्यायप्रिय तरुण पुढे येतो, तेव्हा आशेचा किरण पुन्हा दिसतो.

   सभासदहो, तुमच्या मतदानाचा हक्क म्हणजे केवळ उमेदवार ठरवण्याचा नाही, तर संपूर्ण संस्थेच्या भवितव्याला दिशा देण्याचा आहे. आजच्या मतदानाने आपण निर्णय घ्या!संस्थेला पुन्हा सभासदांसाठी उभी करायचंय की निवडकांसाठी? सहकार परत आणायचा आहे की व्यवहारशाहीला चालना द्यायची आहे..

त्यासाठी मला म्हणजेच निलेश मराठे यांना “छत्री” चिन्हावर मतदान करून विजयी करा असे आवाहन प्रसार माध्यमातून केले.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे