नागपुरात महाल परिसरात दोन गटात आज मोठा राडा झाला. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या खासगी वाहनांची प्रचंड मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली. तसेच दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. पण यावेळी पोलिसांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान जखमी झाले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे.
नागपूरमध्ये काही अफवा पसरवल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीत नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास ही नागपूरची विशेषत: राहिलेली आहे. माझी सर्व बांधवांना विनंती आहे की, त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता प्रस्थापित करावी आणि कुणीही रसत्यावर येऊ नये. सगळ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेला सहकार्य करावं. सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्यानुरुप आपला व्यवहार करावा, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं.
“ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, असा विश्वास मी देतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सर्वाबद्दल माहिती मिळाली आहे. त्यामुळे आपण कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि प्रेमाचं सौहार्दाचं वातावरण ठेवण्यासाठी पोलिसांना मदत करावी, अशी माझी नम्र विनंती आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.



