माणुसकीच नव्हे, संवेदनाही हरपल्या! बिलासाठी घेतल्या मृत महिलेच्या बांगड्या!!
नाशिक (अनिल गोडसे ) : कोरोना महामारीच्या संकटकाळात माणुसकी तर हरवत आहेच; आता माणसांच्या संवेदनाही हरवत असल्याचा प्रत्यय विविध घटनांमधून सध्या येत आहे. काहीसे असेच दोन प्रकार शनिवारी (ता.१७) शहरात उघडकीस आले.
कोरोना रुग्णांची अनामत रक्कम घेतली जाऊ नये, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले असतानाही अनामत रक्कम व बिलापोटी शहरातील काही रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची अडवणूक केली जात आहे. अशाच एका प्रकारात वेळेत अनामत न भरलेल्या मृत महिलेच्या सोन्याच्या बांगड्या ठेवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. येथील देवळाली कॅम्प येथे एका रुग्णालय प्रशासनाने बिलापोटी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्याचा संतापजनक प्रकार समोर आला, तर दुसऱ्या घटनेत आनंदवली येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचे समोर आले आहे.

संबंधित महिलेस १३ एप्रिलला कोरोना उपचारासाठी दाखल केले होते. तेव्हाच अनामत व मेडिकल बिलाचे मिळून सुमारे एक लाख रुपयांची मागणी रुग्णालय प्रशासनाने केली. मात्र, संबंधित कुटुंबीय ३५ हजारच जमा करू शकले. त्यामुळे पुढील दिवसभर व्यवस्थित उपचार न झाल्याने १४ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. दरम्यान, अंत्यसंस्कारानंतर शनिवारी (ता. १७) कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन बांगड्यांबाबत विचारणा केली. त्या वेळी सुरवातीला स्थानिक कर्मचाऱ्यांनी अशा बांगड्याच नसल्याचे सांगितले. मात्र, त्यातून रुग्णालयात गोंधळ होऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केल्यानंतर दुपारी साडेचारला नातेवाइकांना बोलावून घेत, रुग्णालयाने बांगड्या सुरक्षित असल्याचे सांगितले. त्याचवेळी रुग्णालयाचे बिल म्हणून आणखी काही रकमेची मागणी करीत, त्यानंतर बांगड्या दिल्या जातील, असे सांगितल्याने संबंधितांनी सायंकाळी थेट देवळाली कॅम्प पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्याचा आग्रह धरला. मात्र, पोलिसांनी तूर्तास केवळ तक्रार अर्ज घेतला असून, फिर्याद घेतली नसल्याचे मृतांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
(न्यूज सोर्स सकाळ )




