आपल खान्देश

केकी मूस : चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर 50 वर्षं प्रेयसीची वाट पाहणारा महान कलाकार..


आपल्या अनेक छायाचित्रांना, कलाकृतींना त्या दगडी हवेलीत बंदिस्त राहून जन्म दिला. या थोर कलामहर्षीनं जवळपास पाच दशकं विजनवासात घालवली. रोज मध्यरात्री येणाऱ्या रेल्वेच्या डब्यांकडं डोळे लावून बसलेला हा प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या स्वागतासाठी रोजच तयारी करत असे, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ज्यानं स्वतःला कला आणि प्रेमाला वाहून घेतलं अशा केकी मूस यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

एखादी दंतकथा वाटावी अशीच केकींची ही प्रेमकथा. प्रेयसीनं दिलेल्या वचनावर विश्वास ठेवून जवळपास 50 वर्ष आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या येण्याची वाट पाहणारा हा प्रियकर दररोज पंजाब मेल ही रेल्वे गाडी येऊन गेल्याशिवाय जेवत नसत.

खान्देशातील कलामहर्षी केकी मूस या महान कलाकारानं प्रेमात चाळीसगावमध्ये ‘मूस आर्ट गॅलरी’ निर्माण केली. कलामहर्षी केकी मूस कलादालनाचे विश्वस्त व कार्यकारणी सचिव कमलाकर सामंत हे त्यांच्या शालेय जीवनात केकी मूस यांना पहिल्यांदा चाळीसगावमध्येच भेटले होते.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केकींची एक प्रेयसी होती. केकींनी जेव्हा मुंबई सोडून चाळीसगावला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची प्रेयसीही त्यांच्यासोबत येणार होती. ते दोघं लग्न करणार होते, मात्र या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी तिला केकींसोबत पाठवलं नाही.

केकी ज्या दिवशी एकटेच मुंबई सोडून चाळीसगावला निघाले त्या दिवशी त्यांची प्रेयसी त्यांना मुंबईच्या व्हिक्टोरिया स्टेशनवर म्हणजे आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर निरोप द्यायला आली होती. तेव्हा तिनं केकी मूस यांचा हात हातात घेऊन त्यांना वचन दिलं की, एक दिवस ती नक्की पंजाब मेलनं चाळीसगावला येईन आणि त्यांच्या सोबत जेवण करेन, त्यामुळे प्रेयसीनं दिलेल्या वचनावर विश्वास असलेले केकी मूस दिवसभर बंद असलेली बंगल्याची सगळी दारं-खिडक्या रेल्वेगाडी येण्याच्या वेळेला उघडत असत. दिवे लावत असत. दररोज बागेतल्या ताज्या फुलांचा एक गुच्छ ते स्वतः तयार करून ठेवत असत. जेव्हा त्यांच्या बागेतील फुलं कमी झाली तेव्हा त्यांनी शोभेच्या कागदी फुलांचा एक गुच्छ कायमचाच तयार करून ठेवला होता.

तसेच रोज रात्री दोन व्यक्तींच्या जेवनाची तयारीसुद्धा ते करून ठेवत असत. अशाप्रकारे त्यांच्या प्रेयसीच्या स्वागताची ते रोज तयारी करून ठेवत.

 

कलामहर्षी केकी मुस कलादालनाचे विश्वस्त व कार्यकारणी सचिव कमलाकर सामंत म्हणतात, “त्यांनी प्रेयसीला दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळला. दररोज पंजाबमेल रेल्वे गाडी गेल्यानंतरच ते जेवायचे. 31 डिसेंबर 1989 या त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या रात्रीचं जेवण देखील त्यांनी पंजाब मेल गेल्यावरच घेतलं होतं.”

 

सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, केकी गेल्यानंतर त्यांना दोन पत्रं सापडली. त्यातलं एक पत्र त्यांच्या प्रेयसीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरं केकींच्या एक नातलग हाथीखानवाला यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हाथीखानवाला यांनी त्या पत्रात केकींसांठी लिहिलं होतं की त्यांच्या प्रेयसीला लंडनला पाठवण्यात आलं आहे आणि तिकडं तिचं लग्नही करण्यात आलं आहे. मात्र, ते पत्र केकींनी कधीच वाचलं नसल्याचा खुलासा सामंत यांनी केला आहे.केकी 50 वर्षात फक्त दोनच वेळा घराबाहेर पडले. याबाबत बीबीसी मराठीशी चर्चा करताना कमलाकर सामंत यांनी म्हटलंय, “केकींनी 50 वर्षांचा बंदिवास स्वतः स्वीकारला होता.

 

1939 पासून ते 1989 या 50 वर्षांच्या काळात ते फक्त दोनदाच घराबाहेर पडले होते. एकदा 1957 ला त्यांच्या आईच्या अंत्यविधीसाठी ते औरंगाबादला गेले होते.

 

तर दुसऱ्यांदा भूदान चळवळीदरम्यान विनोबा भावेंचं व्यक्तीचित्र घेण्यासाठी 1970 दरम्यान ते चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या वेटींग रूममध्ये गेले होते. खरंतर विनोबा भावेंचें भाऊ शिवाजी नरहर भावे हे केकींचे खास मित्र होते. त्यामुळे शिवाजीरावांच्या आग्रहाखातर ते घराबाहेर पडले होते.”

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे