मग तुमच्या झेंड्यातील हिरव्या रंगाचे काय? अब्दुल सत्तारांनी भाजपला सुनावले!
झूम मराठी वृत्तसेवा
मुंबई : शिवसेनेच्या हिंदुत्वावरून प्रश्नउपस्थित करणाऱ्या भाजपला शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहे. तुमच्या झेंड्यातील हिरव्याचे काय ? असा उलटप्रश्न करत त्यांनी भाजप नेत्यांना सुनावले.
सत्तार म्हणाले, राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते कासावीस झाले आहे. अंब्याच्या झाडाखाली बसण्याची सवय असल्याने आता त्यांना बाभळीच्या झाडाखाली बसतांना त्रास होत आहे. त्यामुळे शिवसेना व त्यांच्या हिंदुत्वाला आव्हान देण्याची भाषा ते वापरू लागले आहेत. शिवसेना कायम भगवी होती आणि भगवीच राहणार आहे. पण भाजपने त्यांच्या झेंड्यात असलेल्या हिरव्याचे काय? सध्या तोच हिरवा रंग बाहेर येऊन बोलतोय का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
शिवसेना हिंदुत्ववादी असून यात अठरापगड जाती-धर्माचे असंख्य कार्यकर्ते जुळलेले आहेत. शिवसेनेत कधीच जातीपातीच्या राजकारणाला थारा दिला जात नाही. पण सत्ता गेली म्हणून कासावीस झालेल्या विरोधी पक्षाला आता दुसरे काही काम उरले राहिले नाही, म्हणून ते जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही सत्तार यांनी केला.




