कोरोना : राज्य सरकारचा मोठा निर्णय; १५ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये, वसतिगृह बंद
झूम मराठी वृत्तसेवा
मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनानं संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी यामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतातही पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली आहे. मात्र आता ओमिक्रॉन नावाच्या कोरोनाच्या व्हेरिएन्टचे रुग्णही वाढताना दिसत आहे. राज्यात करोनाच्या दररोज वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवारी यासंदर्भात सविस्त बैठक झाल्यानंतर आज उदय सामंत यांनी यासंदर्भात ही घोषणा केली. सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी करोनाबाधित असतील तर त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यापीठांना हेल्पलाईन सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व वसतिगृह बंद करण्यात आले आहेत. परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बंद करण्यात येणार नाहीत. खासगी विद्यापीठांनी देखील याच निर्णयाचं पालन करायला हवं, असे ते म्हणाले.




