Dhule Crime : शिंदखेडा तालुक्यात केमिकलयुक्त ताडीचा ‘गोरखधंदा’! राज्य उत्पादन शुल्क, ACB अन पोलिस विभागाकडून डोळेझाक..
शिंदखेडा तालुक्यात ताडीची बोटावर मोजता येतील एवढी झाडे असताना दिवसाला हजारो लिटर ताडीचे ड्रम येतात कुठून, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. तालुक्यात कृत्रिम ताडी पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ताडीची खेळोपाडी मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने रासायनिक ‘क्लोरल हायड्रेट’ केमिकलयुक्त ताडीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने केमिकलयुक्त ताडीचा ‘गोरखधंदा’ खुलेआम सुरू आहे.
शिंदखेडा तालुक्यात दिवी, रेवाडी, खर्दे, वरझडी आदी गावांमध्ये ताडी-माडाची बोटावर मोजता येतील एवढी झाडे आहेत. ५०० ताडी-माडाच्या झाडांमागे एका दुकानाला शासन परवानगी दिली जाते. उत्पादन शुल्क विभागाने तालुक्यात फक्त शिंदखेडा व दोंडाईचा शहरात शासनमान्य दोन दुकानांना ताडी विक्रीचा परवाना दिला आहे.
दिवसला ताडी-माडाच्या झाडांपासून १२० ते १४० लिटर किरकोळ ताडी निघते. मग गल्लोगल्ली मिळणारी हजारो लिटर ताडी येते कुठून, याचा शोध उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिस का लावत नाहीत? यामागे मोठे गौडबंगाल असल्याचे बोलले जाते.
- ‘क्लोरल हायड्रेट’ केमिकल ताडीची विक्री
शिंदखेडा तालुक्यातील शंभरहून अधिक गावांमध्ये केमिकलमिश्रित ताडीची विक्री जोरात सुरू आहे. एका ६५० मिलिमीटर केमिकल ताडीची एका बाटलीची किंमत २५ रुपये एवढी आहे. खाकी वर्दीचा आश्रय मिळाल्याने अशा जीवघेण्या ताडीचा गोरखधंदा जोरात सुरू आहे.
क्लोरल हायड्रेट हा एक नशिला पदार्थ आहे. नशा निर्माण करणारी पांढरी पावडर म्हणूनही याची ओळख आहे. गुंगीचे औषध म्हणून ओळखले जाते. क्लोरल हायड्रेटचे वारंवार सेवन केल्यास त्याचे मोठ्या प्रमाणावर शरीरारावर दुष्परिणाम जाणवतात.
- केमिकलयुक्त ताडीमध्ये आंध्र प्रदेश लॉबी सक्रिय
आंध्र प्रदेश आणि कर्नाटक परिसरातून क्लोरल हायड्रेट पावडर आणली जात असल्याचे माहितीगार सूत्राने सांगितले. क्लोरल हायड्रेट केमिकल जीवघेणे आहे. त्याचे वारंवार सेवन केल्यास शरीरातील क्षमता कमकुवत बनते. निद्रानाश उद्भवतो, चिडचिडेपणा वाढतो, नसा ढिल्या पडता, सतत तहान लागणे, सारखी गोंधळलेली अवस्था असणे, सवय झाल्यानंतर नियमित ताडी न घेतल्यास उलटी होणे, अचानक चक्कर येऊन पडणे, भूक न लागणे असे अनेक आजार केमिकलयुक्त ताडीमुळे उद्भवतात.



