पाटणादेवी मंदिरात जाण्यासाठी पूल नाही, भाविकांचे हाल थांबवावे..!
दिलीप जय परदेशी @ झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
पाटणादेवी येथे १२ व्या शतकातील चंडिकादेवीचे हेमाडपंथी मंदिर असून राज्यभरातून भाविक येत असतात. मात्र मंदिर रस्त्यावर डोंगरी नदी असून त्यावर पूल नसल्याने भाविकांना जीव धोक्यात घालून पात्रात उतरावे लागते. तीन वर्षापासून दर्शनासाठी अशीच कसरत सुरू आहे. उद्या पासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे पुलाचा प्रश्न मार्गी लावावी अशी मागणी भाविकां कडून होत आहॆ.

नवरात्रोत्सवात देवीची यात्रा भरते. नऊ दिवस कुळाचार, नवस, जागरण, गोंधळ असे विविध धार्मिक कार्यक्रमही होतात. मंदिर आणि प्रवेशद्वार यामध्ये डोंगरी नदी असून यावर पूल नसल्याने भाविकांना जीव धोक्यात घालून नदीपात्रात उतरावे लागते. नदीला पाणी असल्यास महिला, वयोवृद्ध नागरिकलहान मुले यांचे हाल होतात. नदीपात्रातून मंदिराकडे जाणेहीधोक्याचे आहे. मात्र गत तीन वर्षापासून ही समस्या ‘जैसे थे’ आहे. मंदिराकडे जाण्यासाठी पूल नसल्याने भाविकांचे प्रचंड हाल होत आहे.

चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी हे मंदिर राष्ट्रीय अभिरक्षित स्थळ असून भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत हा परिसर येतो. डोंगरी नदीवर असणारा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने ठेकेदाराला पुरातत्व विभागाने पूल उभारण्यास सांगितले. मात्र झालेला खर्च देण्याऐवजी औरंगाबादच्या पुरातत्व विभागाने त्यांना उभारलेला लोखंडी पूल काढून नेण्याचे आदेश दिले. तेव्हापासून नदीवर पूल नसल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ही समस्या लक्षात घेऊन स्थानिक आ. मंगेश चव्हाण यांनी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाला वर्षभरापूर्वी पत्र दिले होते. पुरातत्व विभागास पूल उभारणीत अडचण येत असल्यास आमदार निधीतून हे काम करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. याकडेही विभागाने दुर्लक्ष केले आहे. नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. मात्र पुरातत्व विभागाकडून नदीवर पुल उभारण्याच्या हालचाली होत नसल्याने भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागणार का?


