राज आले उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावून! पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र
झूम मराठी न्यूज वेब मीडिया
मुंबई: कोरोनाबाबत सध्या राज्यात फारच गंभीर परिस्थिती आहे. लसीकरण मोहिमेने वेग घेतला असताना लसतुटवडा निर्माण झाला. तशातच दररोज राज्यात ५० हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाउन लागणार की नाही? असा प्रश्न सर्वत्र चर्चिला जात होता. त्याबद्दलचे उत्तर काल स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. काही सेवा निर्बंधासह सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी लॉकडाउनसदृश निर्बंध आणि संचारबंदी पुढील १५ दिवसांसाठी लावण्यात आली आहे. त्याचसोबत उद्धव ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांच्याकडे काही मागण्यांचा पाठपुरावा करत होते. याच कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
- महाराष्ट्र राज्याला स्वातंत्र्य पणे लस खरेदी करू द्या
- राज्यातील खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात
- ‘सीरम’ला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी
- लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातील इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी
- कोविड रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यत पावलं उचलण्याची मोकळीक द्यावी.
याशिवाय, प्रत्येक राज्याची भौगोलिक स्थिती जशी वेगळी आहे तशीच वैद्यकीय स्थितीदेखील वेगळी आहे. त्यामुळे आपापल्या राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व राज्यांना स्वत:च्या राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे स्वातंत्र्य द्यावे. कोरोना स्थिती नियंत्रणासाठी स्थानिक पतिस्थितीनुसार धोरण आखण्याची राज्यांना परवानगी द्यावी. जेणेकरून त्यातून विविध उपाययोजना पुढे येतील. त्याचा इतर राज्यांना आणि पर्यायाने देशालाही फायदा होईल, अशीही मागणी त्यांनी केली.



