महागाईचा भडका : शिवसेनेचे मोदी सरकार विरोधात आंदोलन!
अच्छे दिनच्या नावाखाली गेली सात-आठ वर्ष केंद्रातील भाजप सरकार देशातील जनतेला फसवत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला
झूम मराठी
औरंगाबाद : पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अचानक महागाईचा भडका उडावा तशा पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत.
अवघ्या पाच दिवासांमध्ये पेट्रोल पावणे चार रुपयांनी तर गॅस सिलेंडर दर तब्बल ५० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले, गृहीणींचे आर्थिक बजेट कोलमडले आणि महागाईचा चटका सगळ्यांनाच बसू लागला. केंद्रातील मोदी सरकारने ऐन उन्हाळ्यात जनतेला दिलेला हा धक्का पाहता विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. आज औरंगाबाद येथे शिवसेनेने महागाईचा निषेध करत मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन केले.
शिवसैनिकांनी खांद्यावर गॅसचा सिलेंडर घेऊन तर महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चूल पेटवत वाढत्या महागाईचा विरोध केला. शिवसैनिकांनी २०१४ मध्ये ४१२ रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आता १ हजार ०२५ रुपयांवर जाऊन पोहचला असल्याचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली.
अच्छे दिनच्या नावाखाली गेली सात-आठ वर्ष केंद्रातील भाजप सरकार देशातील जनतेला फसवत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी क्रांतीचौकात रखरखत्या उन्हात शकडो शिवसैनिकांनी मोदी सरकारच्या नावाने शंख करत महागाईचा निषेध केला.

