धुळ्यात 125 दिवसांत उभारले शांतिनाथ कलश मंदिर;
धुळ्यात 125 दिवसांत उभारले शांतिनाथ कलश मंदिर; बांधकामात फक्त मार्बल, एक ग्रॅमही स्टीलचा वापर नाही
धुळ्यातील महावीर साेसायटीत अवघ्या १२५ दिवसांत शांतिनाथ कलश मंदिर उभारण्यात आले आहे. त्यासाठी एक ग्रॅमही स्टीलचा वापर करण्यात आलेला नाही. दगड इंटरलाॅकिंग सिस्टिमद्वारे एकमेकांमध्ये बसवून हे मंदिर उभारले आहे. महाराष्ट्रात पुण्याजवळ एक कलश मंदिर आहे. त्यानंतर हे राज्यातील दुसरे व भारतातील तिसरे कलश मंदिर आहे. मार्बलचा यात वापर करण्यात आला असून इंटरलाॅकिंग सिस्टिमद्वारे ते बसवण्यात आले आहे.
महावीर साेसायटीतील जैन स्थानकात चातुर्मासानिमित्त १६ जूनला साध्वीजी संवेगनिधी श्रीजी यांच्यासह सात साध्वींचे आगमन झाले. त्यांना महावीर साेसायटीतील नागरिकांनी मंदिर उभारण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी शांतिनाथ कलश मंदिर उभारणीची संकल्पना मांडली. त्यानंतर केवळ चार महिन्यांत मंदिराची उभारणी झाली. मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा साेहळा नुकताच झाला. मंदिराचा आराखडा व काम अहमदाबाद येथील अभियंता हार्दिक देवेंद्र साेमपुरा यांनी केले आहे. मंदिरासाठी शीतलनाथ जैन संस्थान व श्री विमलनाथ स्वामी तीर्थ बळसाणे यांचे विशेष याेगदान लाभले. मंदिर उभारणीसाठी विजय राजेंद्रसुरीश्वर, रत्नसुंदरसुरीश्वर, अभयशेखर सुरीश्वर, अनंतकीर्तिश्री यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शांतिनाथ जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष रमेश श्यामसुखा, उपाध्यक्ष रमेश कांकरिया, सचिव राजेंद्र सिसाेदिया, खजिनदार सुरेश साबद्रा, सुरेश मुथा, राजेंद्र श्यामसुखा, पूनमचंद लुंकड, विक्रम श्यामसुखा, राहुल साबद्रा आदींचे सहकार्य लाभले.
अशी आहे मंदिराची रचना
३० बाय ३० जागेत मंदिर उभारले आहे. २० फुटांचा गाभारा आहे. चोहोबाजूंनी ५ फूट जागा साेडली आहे. मंदिराची उंची ३० फूट आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रमुख तीन मूर्ती आहेत. त्यात शांतिनाथ भगवान यांची २७ इंची, आदिनाथ भगवान व शंखेश्वर पार्श्वनाथ भगवान यांची प्रत्येकी २१ इंच मूर्ती आहे.


