चंद्रपूर : संसदेत केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी विदर्भाच्या मागणीचा प्रस्ताव नसल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्र्याचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणारे विदर्भवादी नेते अॅड्. वामन चटप यांच्यासह शेकडो समर्थकांना चंद्रपुरात अटक करण्यात आली. त्यांना स्थानबद्ध करून सायंकाळी त्यांची सुटका केली गेली.
1905 पासून विदर्भ राज्याची मागणी केली जात असून, या मागणीला आता 116 वर्ष पूर्ण होत आहेत. मागील १ वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन, निदर्शने, मोर्चे काढून शासन-प्रशासनाचे लक्ष वेधल्या जात आहे. पण, मागील चार दिवसांपूर्वी संसदेत केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी विदर्भ मागणीचा प्रस्ताव नसल्याचे बगल देणारे विधान केले. हे विधान विदर्भातील जनतेसाठी अन्यायकारक आहे, असे मत अॅड्. चटप यांनी यावेळी व्यक्त केले.
या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने महानगरातील जटपुरा गेटलगतच्या महा गांधी पुतळ्यासमोर केंद्रीय मंत्री रॉय व केंद्रातील मोदी सरकारचा निषेध नोंदवला. त्यांचा पुतळाही जाळण्याचा प्रयत्न होता. पण, आधीच चोख पोलिस बंदोबस्त कायम असल्याने पोलिसांनी पुतळा जप्त केला होता. दरम्यान, विदर्भवाद्यांनी दुपट्टा जाळण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्या विदर्भवाद्यांना अटक केली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा