बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट…भाजपचा उमेदवार मागे घेण्याची केली विनंती
मुंबई : दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेच्या जागेवर निवडणूक लढवली जाणार आहे. काँग्रेसने यासाठी रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. यामध्ये भाजपने देखील संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
रजनी पाटील यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज भाजपने मागे घ्यावा हि विनंती करण्यासाठी पटोले आणि थोरात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. महाराष्ट्राची परंपरा राहिलीय की निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपनं अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संघटनेत चर्चा करुन फडणवीस निर्णय घेतील असं त्यांनी सांगितल्याचं स्पष्टीकरण पटोलेंनी केले आहे.
२२ सप्टेंबर रोजी राजांनी पाटील यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दाखल केला आहे. तर भाजपकडून मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
राजीव सातव यांची कोरोनाच्या संसर्गामुळे १६ मे रोजी निधन झाले. काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. परंतु राजीव सातव यांच्या अचानक निधनामुळे राज्यसभेची जागा रिक्त असल्याने हि निवणूक लढवली जाणार आहे. थोरात आणि पटोलेंनी भाजपाला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली खरी परंतु आता फडणवीस काय निर्णय घेणार हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे


