Jalgaon Police: दोन पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी, दोघेही गंभीर जखमी; जळगावच्या पोलीस दलात उडाली खळबळ, कारणही समोर..


जळगाव: शिस्त आणि कायद्याचे रक्षकच जेव्हा आपसात भिडतात, तेव्हा प्रशासनाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. जळगाव जिल्ह्यात चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये काल शनिवारी रात्री अशीच एक खळबळजनक घटना घडली. ड्युटी लावण्यावरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. या घटनेत दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गेल्या ४-५ वर्षांपासून कार्यरत असलेले शशिकांत पारधी आणि राकेश पाटील या दोन कर्मचाऱ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून धुसफूस सुरू होती. शनिवारी रात्री ड्युटी वाटपाच्या कारणावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा खटका उडाला आणि नंतर थेट हाणामारीला सुरुवात झाली.
दोघेही गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
य धुमश्चक्रीत दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत, शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला असून, त्यांच्यावर चोपडा येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून हात फॅक्चर झाला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे.
पोलीस स्टेशनमध्येच घडलेल्या या राड्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, सध्या या घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू असून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. अंतर्गत वादातून झालेल्या या हाणामारीने पोलिसांच्या शिस्तीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
दोघे पोलीस तीन ते चार वर्षापासून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून हेवे -दावे आहेत. काल ड्युटी लावण्यावरून दोघात वाद झाला. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले, असं पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी स्पष्ट केलं आहे.
http://youtube.com/post/Ugkxsko0ywUXyWFbHbd1Rt9e7kjGvBGC6IGa?si=f7qzJ4dCN3N2WRxv



