जळगावातील धरणांत ५४ टक्के पाणीसाठा
जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. अभोरा, मंगरूळ, सुकी, अग्नावती, हिवरा, बोरी, मन्याड प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.
झूम मराठी जळगाव.
निलेश पाटील – संपादक
जळगाव : जिल्ह्यात मागील चार दिवसात दमदार पाऊस सुरू होती. जिल्ह्यातील अभोरा, मंगरूळ, सुकी, अग्नावती, हिवरा, बोरी, मन्याड प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.
हतनूर, गिरणा, वाघूर प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासांत ११२ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील ९६ मध्यम लघू व तीन मोठ्या प्रकल्पांत सरासरी ५१.९० टक्के उपयुक्त साठा आहे. बहुळा प्रकल्पात तब्बल ५० टक्क्यांहून अधिक पाण्याची आवक झाल्याने ८५.३ टक्के साठा आहे.
जून ते ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून जळगाव, चोपडा, यावल, रावेर तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने बहुतांश ठिकाणी शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पावसामुळे हतनूर प्रकल्पाचे सहा दरवाजे पूर्ण उघडून ३१ हजार ६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे. मोठ्या प्रकल्पात ५८ टक्के साठा आहे. मध्यम प्रकल्पापैकी मोर ६१.९१, बहुळा ८५.०३, तोंडापूर ९३.४१, अंजनी ४७.४८, गूळ ३२.३७, भोकरबारी १६.८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. अभोरा, मंगरूळ, सुकी, अग्नावती, हिवरा, बोरी, मन्याड प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. बोरी प्रकल्पाचे दरवाजे उघडून ७२६१ क्युसेक पाण्याचा विसर्ग बोरीपात्रात, तर मन्याड प्रकल्पातून १८१८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तापी, गिरणाकाठाला दक्षतेचा इशरा
बोरी, तापीसह गिरणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात दोन- तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे बहुतांश मध्यम लघू प्रकल्पांत पाण्याची आवक होत असून, प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. तापी, बोरी, हिवरा, मन्याड आदी प्रकल्प पूर्ण भरले आहेत.



