आपल खान्देश
यावलात हजारो वर्षापूर्वीचे पुरातत्वीय अवशेष आढळून आले
जळगाव : राज्याच्या विविध भागांमध्ये इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आढळून येत असतात. खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात देखील ऐतिहासिक ठेवा मोठ्या प्रमाणात आहे. मागच्याच आठवड्यात जळगावच्या धरणगावात ऐतिहासिक गोलाकार शिलालेख आढळल्यानंतर आज महाराष्ट्र-मध्य प्रदेश या मार्गावर असलेल्या यावल गावात हजारो वर्षापूर्वीचे पुरातत्वीय अवशेष आढळून आले आहेत.
यावल गावात हडकाई आणि खडकाई नदीच्या संगमाजवळच असणाऱ्या टेकडीवर एक गढी बांधण्यात आलेली आहे. या गढीला मराठा कालखंडातील राजे निंबाळकर गढी किंवा निंबाळकर राजेंचा किल्ला असेही म्हणतात. ही गढी गावाच्या बाहेर असून नदीच्या किनाऱ्यावर आहे. गढीकडे जाताना आपल्याला न्यायालय दिसते. या न्यायालयाची इमारत गढीच्या एकदम बाजूलाच उभी आहे. न्यायालयाजवळ पोहोचल्यावर डाव्या बाजूला किल्ल्याचे दोन भव्य बुरुज आणि तटबंदी आपल्याला दिसतात.
आज या ठिकाणी जळगाव येथील हेरीटेज फाउंडेशनचे संचालक व दख्खन पुरातत्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र हैद्राबाद येथील संचालक भुजंगराव बोबडे, महाराष्ट्र राज्यकर सहाय्यक आयुक्त समाधान महाजन, पार्थ महाजन यांनी भेट दिली असता त्यांना अनपेक्षितपणे या ठिकाणी हजारो वर्षापूर्वीचे पुरातत्वीय अवशेष आढळून आले. विशेष बाब म्हणजे हजारो वर्षापूर्वीपासून ते उत्तर मध्ययुगीन कालखंडापर्यंतचे अवशेष इथे आढळले आहेत जी एक अत्यंत दुर्मिळ बाब आहे, असं बोबडे यांनी सांगितलं आहे.

इतिहासाच्या पाऊलखुणा! जळगाव जिल्ह्यातल्या यावलमध्ये आढळले हजारो वर्षांपूर्वीचे पुरातत्वीय अवशेष


