मेहुणबारे (जळगाव) : चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावरील रोहिणी ते तळेगाव दरम्यान भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील चौघांचा मृत्यू झाला. मृतात वाघडू (ता. चाळीसगाव) गावातील एक तर तांदुळवाडी (ता. कन्नड) येथील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. यात गर्भवती महिलेसह दोन पुरूष व नऊ वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. या अपघातात दोन वर्षाचा मुलगा व कार चालकही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
नांदगावकडून चाळीसगावकडे भरधाव वेगात येत असलेले कार (क्र. एमएच ०२ डीजे ७१३४) ने समोरून येणाऱ्या मोटर सायकल (क्र. एम.एच. ०२ ईडी ६४७६) ला समोरून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात मोटरसायकलचा पूर्णपणे चेंदा झाला. तर कारचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत चार जण जागीच ठार झाले असून यात २ पुरुष, एक महिला आणि बालिकेचा समावेश असून अन्य २ वर्षांचा बालक गंभीर जखमी झाला आहे. अपघात दुपारी बाराच्या सुमारास चाळीसगाव– नांदगाव रस्त्यावर घडला.
अपघातात मोटारसायकलवरून विलास मोरे व त्याच्या परिवाराला त्याच्या मूळ गावी तांदुळवाडी (ता. कन्नड) येथे पत्नीला डिलीव्हरीकरीता घरी सोडवयास जात असताना भगवान नागराज पाटील (वय ३६, रा.वाघडू ता.चाळीसगाव), सालदार विलास वसंत मोरे (वय ४०) त्याची पत्नी कल्पना मोरे (वय ३६), मुलगी रेणुका (वय ३) अशी सर्व जण जागीच ठार झाली आहेत. तर २ वर्षांचा चिमूरडा अमोल मोरे अपघातात जखमी झाला असून त्याला उपचारासाठी धुळे येथे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.
तांदुळवाडी (ता.कन्नड) येथील विलास मोरे त्याची पत्नी कल्पना मोरे, मुलगी रेणुका हे सर्व एकाच कुटुंबातील होते. विलास मोरे हा सालदारकीचे काम करुन कुटंब चालवत होता. मात्र भिषण आपघातात पती– पत्नी व मुलगी ठार झाले. तर मुलाचीही परीस्थिती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच एकच आक्रोश झाला होता.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा