आपल खान्देशमहाराष्ट्र
कोरोनाने धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत १३३ बालकांच्या मायेचे छत्र हिरावले!!
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांची शोधमोहीम सुरुरू आहे. त्यामुळे अशा बालकांच्या संख्येत अजून वाढ होऊ शकते. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हास्तरावर कृतिदल स्थापन केले आहे.
धुळे : कोरोनामुळे धुळे- नंदुरबार जिल्ह्यांतील तब्बल १३३ बालके अनाथ झाली आहेत. यात आई-वडील गमावलेल्या बालकांची संख्या ७१ आहे, तर एक पालक गमावलेली मुले ६२ आहेत. सर्वाधिक अनाथ झालेल्या बालकांची आकडेवारी नंदुरबार जिल्ह्यातील आहे.
—– जाहिरात ——

नंदुरबारला ९३ मुले अनाथ झाली आहेत. त्यातील ६६ मुलांनी आपले आई-वडील, तर २७ मुलांनी एक पालक गमावले आहेत. पालकत्व गमावलेल्या बालकांची ही आकडेवारी मंगळवार (ता. २५) पर्यंतची आहे. मात्र, हे आकडे आणखी वाढू शकतात. निराधार झालेल्या या बालकांची जबाबदारी महिला व बालविकास खाते घेणार आहे. अनाथ बालकांची व्यवस्था शासकीय मुलींचे निरीक्षणगृह व बालगृह, तसेच शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहात होणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुळ्यातील ४० बालकांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हिरावून नेले आहे. पाच बालकांच्या आई-वडील दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. माता-पित्यांपैकी एक पालक गमावणाऱ्या जिल्ह्यातील बालकांची संख्या ३५ इतकी आहे. कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांची शोधमोहीम सुरुरू आहे. त्यामुळे अशा बालकांच्या संख्येत अजून वाढ होऊ शकते. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हास्तरावर कृतिदल स्थापन केले आहे.



