ब्रेकिंग

आज पासून कल्याणमध्ये रंगणार ग्लोबल खान्देश महोत्सव; ४ दिवसांची रंगारंग मेजवाणी..

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे दिले जाणारे या वर्षीचे खान्देश भूषण, खान्देश उद्योग रत्न, खान्देशश्री पुरस्कार जाहीर..

 

कल्याण | ग्लोबल खान्देश महोत्सव 25

@दिलीप जय परदेशी

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आयोजीत ग्लोबल खान्देश महोत्सव दिनांक २८ ते ३१ मार्च २०२५ रोजी दररोज संध्याकाळी ४.०० ते रात्री १०.०० पर्यंत चार दिवशीय महोत्सव कल्याण शहरातील आत्माराम भोईर चौक, उंबर्डे रोड, सेंट लॉरेन्स स्कूल समोर, कल्याण पश्चिम येथे रंगणार आहे. संपूर्ण कल्याणकरांसाठी खानदेश वासियांसाठी हा महोत्सव म्हणजे पर्वणीच असते खानदेशातील अतिशय प्रसिद्ध अशा सर्वच गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला आणि आस्वाद घ्यायला मिळतात अनेक जण आतुरतेने या महोत्सवाची वाट बघताना दिसून येतात. दिवसेंदिवस महोत्सवा ची वाढत जाणारी लोकप्रियता आणि कल्याणकरांचा लाभणारा उदंड प्रतिसाद या साऱ्या गोष्टींचा विचार करत या वर्षाचा ग्लोबल खान्देश महोत्सव हा फडके मैदान, लालचौकी, कल्याण येथे आयोजित करण्याचे ठरले आहे.

उत्सव म्हणजे मातीशी नातं सांगणारा उत्सव. ना नफा ना तोटा या तत्त्वावर फक्त अनेक होतकरू शेतकरी आणि उद्योजक यांना हक्काचं एक व्यासपीठ, रोजगार उपलब्ध व्हावा. त्यांच्या खाद्यपदार्थांची विक्री या ठिकाणी त्यांना करता यावी. यासाठी या खानदेश महोत्सवाचा आयोजन हे करण्यात येत असते. आपल्या मातीचा उत्सव, चला साजरा करूया खान्देश महोत्सव. कृषी-खाद्य, कला-उद्योग-पर्यटन, गौरव, पर्यावरण हि ग्लोबल खान्देश महोत्सव दिनांक २८ ते ३१ मार्च २०२५ रोजी दररोज संध्याकाळी ४.०० ते रात्री १०.०० पर्यंत वाजेपर्यंत सर्व कार्यक्रमांची रेलचेल चालणार आहे.  कल्याण पश्चिमकरांसाठीच नव्हे तर मुंबई ते कर्जत, कसारा, मुंबई ते डहाणू या पट्ट्यातील खान्देशवासीयांसाठी मेजवानीचा हा महोत्सव अध्यक्ष विकास पाटील व इतर मंडळीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणार आहे

ग्लोबल खान्देश महोत्सव हा चार दिवसीय असणार हा शानदार, बहारदार व दिमाखदार खान्देशी संस्कृतीचा सांस्कृतिक महोत्सव खान्देशी रुढी, परंपरा, रीतीरिवाज, सण, उत्सव, संस्कृती व भाषा यांचं जतन, संवर्धन, संरक्षण व संक्रमण करणे या साठी खुलं व्यासपीठ म्हणजे ग्लोबल खान्देश महोत्सव. गेल्या दहा वर्षापासून खान्देश महोत्सव लोकल टू ग्लोबल होत आगळी वेगळी उंची गाठत आहे. खाद्यसंस्कृती, कृषीसंस्कृती, कलासंस्कृती, पर्यटन संस्कृती व उद्योगसंस्कृती यांची ओळख व माहिती पुढील पिढीसाठी पथदर्शी व मार्गदर्शक ठरेल याच दृष्टीने कार्यक्रमाचं आयोजन व नियोजन करण्यात आले आहे.

पुरणपोळी, धिरडे, वांग्याचं भरीत, बट्टी, डायगंडुरी, खिचडी, सारभात, गुळाची जिलेबी, कुरडई, लोणचे, वड्या विविध प्रकारचे पापड, यांनी सजलेले स्टॉलची सर्व कल्याणकर वाट पाहत असतात. ग्लोबल खान्देश महोत्सवाला भेट. देण्याचे अजून एक कारण कडधान्ये, तृणधान्ये, तेल, खोबरे, मसाले व चटणी याची दुकाने महोत्सवाचं आकर्षणबिंदू ठरतात. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत अहिराणी गाणी, गीते, नृत्य, पोवाडे, भारुडे ही मनोरंजनाची परिसीमाच असते. महोत्सवात ना नफा ना तोटा तत्वावर असंख्य दुकाने थाटली जातात आणि ते विक्रीच्या माध्यमातून लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवितात.त्यामुळे खान्देशी गरजूंना व्यवसायाची संधी मिळते.  चार दिवसात करोडोची उलाढाल होते.  हीच महोत्सवाच्या यशस्वीतेची पोचपावती आहे. जन्मभूमी खान्देश असली तरी कर्मभूमी कोकण असल्यामुळे कोकणात खान्देशी संस्कृतीचा प्रसार व प्रचार करणं हेच उत्तर महाराष्ट्र खान्देश मंडळाचं उद्दिष्ट आहे. ग्लोबल खान्देश महोत्सव म्हणजे कल्याणकारासाठी जणू आनंदाची, उत्साहाची पर्वणीच असते.खाद्य संस्कृती, कलासंस्कृती व मनोरंजन संस्कृतीचं यथार्थ दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांची रेलचेल म्हणजे ग्लोबल खान्देश महोत्सव होय.

खान्देश ही संत, कवी, लेखक, साहित्यिक, विचारवंत, शिल्पकार, नाटककार, कलाकार, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ व स्वातंत्र्यसेनानी सारख्या श्रेष्ठ व ज्येष्ठ नररत्नांची खाण आहे. त्या नररत्नांचा कर्तृत्व व जीवनपट तरुण पिढीला द्यात व्हावं म्हणून “अनाजधून व्यक्ती विशेषांक” त्याचप्रमाणे गड, किल्ले, नद्या, मंदिरे, थंड हवेची ठिकाणे, प्रेक्षणीय व ऐतिहासिक स्थळांची माहिती संकलित करुन “अनाजधून पर्यटन विशेषांक” मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आलेली आहे. दरवर्षी ग्लोबल खान्देश महोत्सवात विविध क्षेत्रातील तीन खान्देशी दिग्गजांना खान्देश भुषण, खान्देश रत्न व खान्देश उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

  • यंदाचे खान्देशभूषण, खान्देशउद्योगरत्न, खान्देशश्री पुरस्कार जाहीर

या वर्षी ग्लोबल खान्देश महोत्सव निमित्त दिले जाणारे खान्देश भूषण, खान्देश उद्योगरत्न, खान्देशश्री पुरस्कार या वर्षी पद्मश्री श्री चैत्राम पवार व महाराष्ट्र केसरी श्री युवराज वाघ यांना खान्देश भूषण, श्री नरेंद्र सूर्यवंशी यांना खान्देश उद्योगरत्न तर श्री बी एन पाटील, डॉ. विजय महाजन श्री.हेमराज बागुल, श्री आशिष पाटील, श्री. रामचंद्र भिवसने यांना खान्देशश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

याकार्यक्रमा प्रसंगी मा. मंत्री महोदय,  मा. खासदार महोदय, आजी माजी मा.आमदार महोदय, मा.नगरसेवक व कल्याण नगरीतील धुरंधर राजकारणी व समाजकारणी यांची लक्षवेधी उपस्थिती असणार.

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाची अध्यक्ष म्हणून धुरा विकास पाटील सर तनमनधनाने एकहाती सांभाळत आहेत. तर खजिनदार म्हणून ए.जी.पाटील चोखपणे व सक्षमपणे आणि सचिव म्हणून दिपक पाटील समर्थपणे भुमिका पार पाडत आहेत. उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या विविध उद्देशासाठी विविध शाखा कार्यरत आहे. जागतिक अहिराणी परिषदेचे कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील व कार्यवाह प्रकाश माळी, उत्तर महाराष्ट्र जल परिषदेचे कार्याध्यक्ष एन.एम.भामरे व भिला पाटील, स्वातंत्र्य सेनानी लीलाबाई पाटील महिला बचत गटाच्या कार्याध्यक्षा वैशाली पाटील व कार्यवाह वर्षा पाटील आणि खान्देश उद्योग, चेंबर ॲन्ड कॉमर्स चे कार्याध्यक्ष प्रदीप अहिरे व कार्यवाह दिपक पाटील यांच्या प्रभुत्वाखाली शाखा अत्यंत प्रभावीपणे व पारदर्शीपणे कार्य करीत आहेत.जागतिक अहिराणी परिषदे मार्फत अहिराणी शब्दकोश निर्मिती, अहिराणी साहित्य संमेलन, अहिराणी भाषा दिन, अहिराणी दिनदर्शिका, विद्यार्थी गुणगौरव, व अहिराणी साहित्य पुरस्कार वितरण करणे.

उत्तर महाराष्ट्र जल परिषदेमार्फत उत्तर महाराष्ट्रातील नद्या, धरणे, कालवे, तलाव, बंधारे व उपसा जलसिंचन योजना यांचा अभ्यास करुन अपुर्ण, प्रस्तावित व प्रलंबीत जलसिंचन प्रस्तावांसाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणे, जनजागृती करणे, आंदोलने करणे, परिसंवाद आयोजित करणे आणि जलतज्ज्ञ यांचं जल प्रेमींसाठी ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित करणे.

महिला बचत गटामार्फत दिवाळी फराळ म्हणून खान्देशी खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारणे व विक्री करणे, बेरोजगार महिलांना व्यवसायासाठी सहकार्य करणे, प्रोत्साहन देणे,हळदी कुंकू समारंभ व आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमाचं आयोजन करणे.

खान्देश उद्योग, चेंबर्स अँड कॉमर्स तर्फे बेरोजगार तरुण, तरुणींना व महिलांना उद्योग व व्यवसायाचं कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण देणे, तज्ज्ञांचं ऑनलाईन मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे. खान्देशातील उद्योगांची माहिती देणे. खान्देशात उद्योग उभारणीसाठी केंद्र व शासनाकडे पाठपुरावा करणे.

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे आगामी आकर्षण अर्थात संकल्प म्हणजे कल्याण नगरीत समस्त खान्देश वासियांसाठी खान्देश भवन व उद्योग भवन,ज्येष्ठांसाठी स्नेहालय व सांस्कृतिक कट्टा,तरुणाईसाठी अभ्यासिका व ई- लायब्ररी आणि शिक्षण व नोकरीनिमित येणाऱ्या तरुण तरुणाईसाठी वसतिगृह व भोजन सुविधा उभारणी होय.

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, कार्याध्यक्ष बापुसाहेब हाटकर, उपाध्यक्ष एल. आर. पाटील, उपाध्यक्ष एन. एम. भामरे, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, उपाध्यक्ष प्रदीप अहिरे, खजिनदार ए. जी. पाटील आणि सचिव दिपक पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सव यशाची एकेक शिखरे सर करीत आहे. श्री विनोद शेलकर ,सौ सुनीता बोरसे, श्री मिलिंद बागुल, श्री प्रकाश पाटील, श्री विनायक संन्यासी, श्री मंगेश भामरे , सौ आशा वाडीले, सौ चेतना भालेराव,श्रीरंग अत्रे, अरुण अहिराव, सुनील पाटील सुभाष सरोदे, प्रवीण सनेर, अनिरुद्ध चव्हाण असे एक ना अनेक मान्यवर यासाठी रात्रंदिवस कार्य करीत असतात.

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे व समित्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ग्लोबल खान्देश महोत्सव ऐतिहासिक व संस्मरणीय होण्यासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक वर्षी महोत्सवाचं वेगळेपण जपण्यासाठी सर्व खान्देशी समाज मंडळे स्वयंस्फूर्तीने व स्वेच्छेने आपलं योगदान देत असतात… दर्दी रसिक प्रेक्षकांची गर्दी हेच आमचं प्रमुख आकर्षण असणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे