आपल खान्देश
जळगाव जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा !
जळगाव : आगामी मॉन्सून कालावधीत जिल्ह्यात महसूल विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. शोध व बचाव साहित्याची तपासणी करून सर्व साहित्य सुस्थितीत ठेवावे. आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास सर्व यंत्रणांनी आपापसांत समन्वय ठेवून परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी आज केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मॉन्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे झाली. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंह रावळ उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, की मॉन्सुनकाळात आपत्ती प्रवणक्षेत्रात पुरेसा धान्यसाठा व वितरण करण्याचे नियोजन करावे. अंत्योदय योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मॉन्सूनकाळात धान्य पुरवठ्याचे नियोजन करावे. आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांबाबत पुरेसा औषधसाठा करून ठेवावा. आवश्यक औषधसाठ्याची मागणी नोंदवावी, जलजन्य व किटकजन्य आजार होऊ नयेत, याबाबत दक्षता घ्यावी.
पाटबंधारे विभागाने धरणनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून पूररेषा निश्चित करावी. धरणातून विसर्ग सुरू करणार असल्यास त्याबाबतची माहिती दवंडी, सायरण यंत्रणेद्वारे द्यावी, हवामान खात्याकडून येणारे संदेश शेतकऱ्यांना वेळेत पोचविण्याचे काम कृषी विभागाने करावे. बांधकाम विभागाने रस्त्यांवरील पूल, पडणारी झाडे, तसेच पाझर तलाव यांची पाहणी करून घ्यावी, तर पालिकांनी आपल्याकडील अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावी. वीज वितरण कंपनीने लोंबकळणाऱ्या तारा, उघडे ट्रान्स्फॉर्मर, धोकादायक पोल यांची दुरुस्ती करावी. आपत्तीच्या काळात कोणीही पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाही, याची सर्व संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी.


