जळगाव जिल्ह्यात ‘उद्धव ठाकरे गटाची’ ताकद वाढली, तर गुलाबराव पाटलांची ‘या’ कारणामुळे चिंता वाढली..
जळगाव (झूम विशेष ) घरकुल गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत त्यांचा नियमित जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना राज्यात कुठेही फिरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ते आता जळगावतही येऊ शकणार असल्याने त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेसोबत बंडाळी केल्यानंतर जिल्ह्याचे विद्यमान पालमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे गट जिल्ह्यात कमजोर झाला होता. मात्र, सुरेशदादांना जामीन मिळाल्याने ठाकरे गटाची ताकद वाढली आहे.
माजी आमदार सुरेशदादा जैन यांना घरकुल गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने वैद्यकीय उपचारासाठी जामीन मंजूर केला होता. त्यामुळे ते मुंबई वगळता राज्यात कोठेही जाऊ शकत नव्हते. ते आपल्या जळगाव मतदारसंघातही आले नव्हते. आपल्याला नियमित जामीन मंजूर करावा यासाठी सुरेश जैन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने आज त्यांचा नियमित जामीन मंजूर केला असल्याची माहिती महापालिकेतील ठाकरे गटाचे गटनेते नितीन लढ्ढा यांनी दिली.
सुरेशदादा जैन यांना नियमित जामीन मिळाल्याचे वृत्त येताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर फटाके फोडून जल्लोष केला. महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे आदी यावेळी उपस्थित होते. नियमित जामीन मंजूर झाल्यामुळे सुरेशदादा जैन हे आता कुठेही फिरू शकतात, ते आता जळगाव येथेही लवकर येतील, असेही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. जैन यांचा जळगाव जिल्ह्याचे नव्हे तर राज्याच्या राजकारणात एक वेगळा दबदबा होता. जळगाव विधानसभा मतदारसंघातून सलग नऊ वेळा ते निवडून आले होते. सन १९८५ पासून जळगाव महापालिकेवर त्यांचे तब्बल ३० वर्षे वर्चस्व होते.


