गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार धनंजय मुंडे, त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे !
झूम मराठी न्यूज नेटवर्क
जळगाव : दिवंगत गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर महाराष्ट्रातील राजकीय चित्र वेगळे असते. गेल्या पाच सात वर्षात जे तुम्हाला आम्हाला जे अनुभवायला मिळाले, ते मिळाले नसते. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची अधिक प्रगती झाली असती. त्यांनी वेळ पडल्यास मुख्यमंत्रिपदाची अदलाबदल केली असती. धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.
जळगाव शहरातील मेहरूण परिसरात लोकनेते (स्व.) गोपीनाथराव मुंडे प्रवेशद्वाराचे भूमिपूजन मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी मंत्री एकनाथ खडसे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, महापौर जयश्री महाजन आदी उपस्थित होते.
खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा आणि नेतृत्वाचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, त्यांनी भाजपसाठी रक्ताचे पाणी केले आणि हा बहुजन समाज, छोटे, मोठे समाजाला भाजपमध्ये सहभागी करवून घेतले. वंजारी समाज असेल, धनगर समाज असेल, माळी, कोळी, साळी, लेवा पाटील असेल काय असतील नसतील ते मुस्लीम, मागासवर्गीय सगळे समाज त्यांनी भाजपात आणले. पक्षाचा चेहरा बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि बहुजनांचा पक्ष म्हणून त्या कालखंडात भाजपची ओळख निर्माण झाली. मुंडे यांनी विविध समाज घटकांना एकत्र केल्याची माहिती खडसे यांनी दिली. ते म्हणाले, राज्यात शिवसेना, भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यावर मंत्रीमंडळात आम्ही सोबत काम करीत असताना त्यांनी `माधव` म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी अशा स्वरूपाचा प्रयोग करून अन्य बारके बारके समाज त्या खाली संघटीत करण्याचे काम केले. महाराष्ट्रात पहिल्यांदा त्यांच्या प्रयत्नामुळे वंजारी समाजाला तीन टक्के आरक्षण मिळाले. एनटी, व्हीजेएनटी, डीटीएनटी हे घटक प्राधान्याने नोकरीत घेतले गेले. हे केवळ मुंडे साहेबांमुळेच शक्य झाले.
ते पुढे म्हणाले, मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढल्यामुळे राज्यात युतीचे सरकार आले. पुढे जे काम केले त्याने पक्षाचा मोठा विस्तार झाला. हे स्वरूप विस्तारत असताना त्यांनी धनंजय मुंडे यांना राजकारणात आणले. राजकारणात त्यांचा वारस म्हणून धनंजय मुंडे यांना पुढे आणले. धनंजय मुंडे यांनी साऱ्या समाजांना बरोबर घेऊन काम करीत हा वारसा सिद्ध करून दाखवला. राजकारणात आणि व्यक्तीगत कामकाजातून त्यांनी ते केले.


