राज्यातील २० आमदार आणि १० मंत्री कोरोनाबाधित- उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोना या आजाराने काही दिवसांसाठी विश्रांती घेतल्यानंतर, आता पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. येत्या काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. परंतु, या सर्वांमध्ये धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल २० आमदार आणि १० मंत्री कोरोनाबाधित असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडून कोरेगाव भीमा येथे पत्रकारांशी बोलताना याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेते मंडळींच्या घरात लग्न सोहळे पार पडत आहेत. यामध्ये कोरोनाच्या कोणत्याही नियमाचे पालन खुद्द मंत्र्यांकडून केले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना संबंधीचे नियम हे फ़क़्त सामान्य जनतेसाठीच आहेत का? असा प्रश्न सामान्य लोकांकडून विचारण्यात येत आहे. तर, ४ दिवस चाललेल्या हिवाळी अधिवेशनात देखील आमदार हे विना मास्क आणि कोरोनाचे कोणतेही नियम पाळत नसल्याचे दिसून आले. पण, आता अचानकपणे २० आमदार आणि १० मंत्री कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आल्यानंतर इतर नेतेमंडळी देखील चिंतेत असल्याचे सांगण्यात येत आहे. नेते मंडळींच्या घरी लग्न सोहळे पार पडल्यानंतर त्याठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या इतर मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना धडकी भरली असणार हे मात्र निश्चित आहे.
सध्या खासदार सुप्रिया सुळे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी मंत्री के.सी. पडवी, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार राधाकृष्ण विखेपाटील, आमदार सागर मेघे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार शेखर कदम, आमदार माधुरी मिसाळ, मुक्ताई नगरचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी मंत्री दीपक सावंत हे आतापर्यंत कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे.



