ब्रेकिंग

पुढच्या आठवड्याभरात मुंबईत लोकल ट्रेन बंद होणार?

दुसऱ्या टप्प्यातील कोरोना डोईजड होण्याआधीच प्रशासनाद्वारे खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात झाली. महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्या बैठका होताहेत.

 

टीम – झूम मराठी न्यूज डिजिटल मीडिया

दिनांक 22 मार्च 2021     सोमवार 

मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील कोरोना वेगाने पसरत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. लोकलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग न राखणे, मास्क न घालणे, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी असलेल्या वेळी सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास होणे, अशा बाबी सध्या होत आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कोरोना डोईजड होण्याआधीच प्रशासनाद्वारे खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्या बैठका होत आहेत. यातून पुढील आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास लोकल सेवेवर निर्बंध लावण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्य प्रवाशांसाठी तब्बल 11 महिन्यांनी लोकल सेवा सुरू झाली. सर्वसामान्य प्रवाशांनी 1 फेब्रुवारीपासून लोकल प्रवास सुरु केला. यावेळी कोरोना नियमांचे पालन करावे, सर्वसामान्य प्रवाशांनी गर्दीच्यावेळी प्रवास टाळावा अशा सूचना राज्य सरकारच्यावतीने देण्यात आल्या होत्या. या सूचनांचे पालन प्रवाशांकडून करून घेण्यास प्रशासनास सज्ज राहण्यास सांगितले होते. मात्र, फेब्रुवारीचा संपूर्ण महिना कोणत्याही वेळी सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास लोकलमधून होत होता. स्थानकात शिरकाव करेपर्यंत मास्क लावण्यात येत होता. त्यानंतर मास्क नाका-तोंडाऐवजी मानेवर मास्क येऊ लागला. रेल्वे प्रशासनाने स्थानकावर प्रवाशांना उभे राहण्यासाठी गोल-गोल तयार केले होते. मात्र काही दिवसातच हे सर्व गोल गायब झाले. दर फेरीला  लोकलमध्ये होणारी फवारणीही बंद करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाचा गलथान कारभाराने प्रवासी नियमांचे उल्लंघन करून प्रवास करू लागले, अशी भूमिका प्रवासी संघटनेकडून मांडण्यात आली.

मार्च महिन्यात दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने, रुग्ण संख्या वाढू लागल्याने प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत. मुंबईत कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर लोकल प्रवासासंदर्भात बैठकी, चर्चासत्र सुरू आहे. पुढील आठवड्यात लोकल प्रवासासंदर्भात नवीन नियमावली लागू होण्याची शक्यता आहे, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.

दरम्यान, पुढील चार-पाच दिवसातील कोरोना रुग्ण संख्याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर पुढील आठवड्यात अंतिम बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे