राज्यात करोनाच्या नावाखाली शाळांचा लपंडाव
झूम मराठी वृत्तसेवा
राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनच्या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत सरकारने राज्यातील शाळा बंद करण्याचा तात्पुरता निर्णय घेतला होता. मात्र, सरकारच्या शाळा बंदच्या निर्णयाला पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून चांगलाच विरोध होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
कोरोनाच्या नावाखाली शाळा बंदचा लपंडाव कधीपर्यंत चालेल असा सवालही या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे शाळा बंद आहेत, दुसरीकडे हॉटेल बार, चित्रपटगृह व दारू दुकाने तसेच छोटे-मोठे कार्यक्रम सर्रासपणे सुरू आहेत. मात्र, कोरोनाच्या नावाखाली शाळा बंद ठेवून राज्य सरकारने शिक्षणाचा बट्याबोळ सुरू केल्याचा आरोपही पालकांकडून होत आहे.
तब्बल दीड वर्षानंतर जेमतेम महिना-दोन महीने सुरू झालेल्या शाळा बंद केल्याने विद्यार्थ्याच्या नशिबी पुन्हा एकदा ऑनलाइन शिक्षणाचा फेरा आला आहे. शासनाच्या या निर्णायाला अनेक पालक वर्गातून विरोध केला जात आहे. तब्बल दीड वर्ष घरी बसून ऑनलाइन शिक्षणाचा वनवास संपला, असे वाटत असताना ग्रामीण व शहरी भागात कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू झाल्या होत्या. अवघ्या एक ते दीड महिन्यातच पुन्हा शाळा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याने या निर्णयाचा विरोधात पालक विद्यार्थी सह शिक्षणप्रेमीकडून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.




