महाराष्ट्रराजकीय

चार राज्यांचे निकाल आणि महाराष्ट्र..

तुम्ही सर्वाना सर्वकाळ फसवू शकत नाही, अशा आशयाचे एक वचन आहे. त्याचा प्रत्यय महाराष्ट्राच्या राजकारणात येत आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तरी एक धडा सर्वच पक्षांनी घेण्याची गरज आहे. तो म्हणजे आजचा काळ स्पर्धात्मकतेचा आहे. त्यामुळे अगदी छोट्या पदाच्या नोकरीसाठीही दहा बारा लाख अर्जदार असण्याच्या काळात एखाद्या पक्षाला असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरि… ही वृत्ती फारशी उपयोगाची नाही, हेही या निवडणूक निकालांमुळे स्पष्ट झाले आहे.

चार राज्यांमधील निवडणूक निकालांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) चित्र स्पष्ट आहे, अशा वल्गना कोणी केल्या तर तेही योग्य नाही. एक तर देशातील मतदार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधे, विधानसभा निवडणुकांसाठी आणि लोकसभा निवडणुकांमधे मतदान करताना वेगवेगळा विचार करतो, हे यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमधे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे चार राज्यांच्या निवडणुकांमधून राजकारण किंवा निवडणुका हा किमान अर्धवेळ नोकरीसारखा प्रकार नाही किंवा पार्टटाइम जॉब नाही, हे काही पक्षांच्या काही नेत्यांच्या लक्षात आले तरी पुरेसे आहे.

महाराष्ट्राबद्दल विचार करायचा झाला तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासारखा संपूर्ण देशभरात खऱ्या अर्थाने अहोरात्र राजकारणी असणारा नेता आपल्या राज्यात आहे. पण, राजकारणातील सातत्याचा अभाव, धुरंधर राजकारणी ही ख्याती मिळवूनही राजकीय विश्वासार्हतेवरील प्रश्नचिन्ह आणि स्वतःच्या पक्षातील फूटही थांबवण्यात आलेले अपयश आदी कारणांमुळे शरद पवार महाराष्ट्रातच (Maharashtra) अडकून पडले आहेत. परिणामी, जवळपास पस्तीस वर्षांपूर्वी १९९१ मधे पंतप्रधान पदासाठी दावा सांगत नरसिंह राव या भारतीय राजकारणातील चाणक्य समजल्या गेलेल्या नेत्याला आव्हान देणारे शरद पवार यांच्यावर आज २०२३ मधे मला राजीनामा देण्याचा आणि तो मागे घेण्याचा निर्णय घेण्याची क्षमता आहे, हे आपल्याच पुतण्याला समजावून सांगण्याची वेळ आली आहे.

  दुसरीकडे आपापले पक्ष सांभाळायला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार हे सक्षम आहेत, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांच्या उर्वरित सेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) सांगत आहेत. मुळात, शिवसेना (Shivsena) किंवा राष्ट्रवादी कॉँग्रेस (NCP) या पक्षांमधे उभी फूट पडल्यानंतर ठाकरे किंवा शरद पवार यांच्याकडे उरलेला पक्ष लक्षात घेतला तर उर्वरित ताकद साधारणपणे दोन्ही पक्षांच्या तीस टक्क्यांची आहे. तरीही संजय राऊत यांना ठाकरे आणि शरद पवार आपापले पक्ष सांभालायला सक्षम आहेत असे वाटत आहे. तेही संपूर्ण पक्षावरच मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी दावे सांगितल्यावर, हे विशेष. राऊत बोलतात ते शरद पवार यांच्यावतीने, हे आता महाराष्ट्राला सांगायची गरज उरलेली नाही.

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, या म्हणीचा प्रत्यय महाराष्ट्रातील काही नेत्यांना आणि पक्षांनाही आता येऊ लागला आहे. त्याबरोबर सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो…याचाही प्रत्यय काही नेत्यांना पक्षांना येऊ लागला आहे. अर्धा पेला भरलेला आहे की रिकामा, हे बघणाऱ्याच्या दृष्टीवर तसेच विचार करण्यावर अवलंबून असते, त्या प्रमाणेच असंगाशी संग कोणता आणि सुसंगती कोणती, हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर किमान हे साधे निवडीचे प्रश्न काही लोकांपुरते तरी संपले तरी खूप झाले. लोकांना गृहीत धरता येत नाही, हा धडाही चार राज्यांच्या निवडणुकांनी दिला आहे. निवडणूक कोणतीही असो, ती हलक्याने न घेता कसून प्रयत्न करणे, हे गरजेचेच असते, हाही धडा या निकालांनी दिला आहे. निवडणुकांमधील स्लोगन्स, त्या त्या राज्यातील स्थिती, प्रश्न, आश्वासने, त्यांची पूर्तता, त्याबद्दल लोकांना असलेला विश्वास आणि लोकांचा केलेले भ्रमनिरास या सर्व गोष्टींचे सखोल विशेलषण पुढचे दोन तीन दिवस होतच राहील. पण, मुळात लोकांना गृहीत न धरता महिला, युवक, शोषित वंचित, लहानथोर अशा सर्व समाजघटकांसाठी काम करणे, हाच समाजकारणात महत्त्वाचा मुद्दा ठरतो, हेही सिद्ध झाले आहे. त्याबरोबरच आपल्याकडे एखादे ग्यारन्टी कार्ड असले तर आणि तरच लोक विश्वास ठेवतात. महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर भूतकाळात जाऊन चारित्र्य बदलण्याची मुभा किंवा टाइम मशिन आज तरी उपलब्ध नाही. हेच महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या आखाड्यात निर्णायक आणि महत्त्वाचे ठरणार आहे.

लेखन – शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :  शैलेन्द्र परांजपे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत आमचा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे