शिक्षण क्षेत्रात प्रवेश करणार्या, शिक्षकांमध्ये प्रतिक्षा निकालाची !
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शिक्षक पात्र परीक्षा नोव्हेंबर 2021 मध्ये राज्यात कोविड 19 च्या काळात पार पडल्या. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अतिरिक्त कार्यभार त्यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडे होता. कोरोनाच्या संकंटात निर्विघ्नपणे पार पडलेल्या परीक्षेला मात्र आता विघ्न लागले आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण परीक्षा (म्हाडा) गैरव्यवहार प्रकार उघडकीस आला. खाजगी साफ़्टवेयर कंपनीने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी चालू असताना शिक्षक पात्र परीक्षा विद्यार्थ्यांना देण्यात आलेले ओळख पत्र धाडीत सापडले. पोलिसांची सुत्रे फिरताच नवीन घबाड पोलीसांच्या हाती लागले व शिक्षक पात्र परीक्षा घोटाळा चव्हाटय़ावर आला.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर अंदाजे आठ हजार शिक्षकांच्या निकालात घोळ असल्याचे लक्षात आले. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी तत्काळ तुकाराम सुपे यांचे निलंबन करून चौकशी समितीची स्थापना केली आहे.
शिक्षक पात्र परीक्षा निकाल अद्याप न लागल्याने अभ्यास करुन शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिक्षकांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. धर्मेद ठाकरे व अभय द्विवेदी या प्रशिक्षार्थीने शिक्षण विभागाने लवकरात लवकर निर्णय लावण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्य सरकारने घोट्याळ्याची व्याप्ती लक्षात घेता गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करून शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर आळा घातला पाहिजे अशी मागणी विजय महाजन यांनी केली आहे. परीक्षा निकालाची प्रतिक्षा आणखी किती काळ करायची असा प्रश्न परीक्षा दिलेल्या प्रशिक्षार्थी करत आहेत. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड या स्वतः शिक्षक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत यामुळे त्या याप्रकरणी लवकर न्याय देतील अशी इच्छा भावी शिक्षक व्यक्त करत आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा