देश-विदेशमहाराष्ट्र
ज्योतिष अभ्यासक्रम तातडीने मागे घ्यावा; महाराष्ट्र अंनिसची मागणी
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) यंदाच्या वर्षापासून सुरु केलेला ज्योतिष विषयावरील अभ्यासक्रम तातडीने रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. ज्योतिष या विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते एक छद्म विज्ञान आहे. ग्रह, गोल, ताऱ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला ‘खगोलशास्त्र’ असे म्हणतात. खगोल शास्त्राच्या उपलब्ध अभ्यासानुसार ग्रह, गोल, ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे अशा संपूर्ण अशास्त्रीय गोष्टींचे प्रशिक्षण देण्याचा दावा करणारा ज्योतfष अभ्यासक्रम तातडीने रद्द करणे आवश्यक आहे, असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रसिद्धी पत्रकाच्याद्वारे सांगितलं आहे
इग्नूच्या ह्या अभ्यासक्रमात चंद्रग्रहण, सूर्यग्रहण अशा खगोल शास्त्रीय घटनाच्या विषयी अज्ञान आणि भीती पसरवण्याचे काम केले जात आहे. ग्रहणाच्या कालखंडात नीट आहार न घेतल्याने गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली असताना अशा गैरसमजांना बळकटी देणाऱ्या अवैज्ञानिक गोष्टी ह्या लोकांच्या जीवाशी खेळ आहेत, असे देखील ह्या पत्रकात पुढे म्हंटले आहे. एकाच वेळी ज्योतिषाला विज्ञान म्हणायचे आणि त्यावर आधारित उपाय सुचवायचे. दुसरीकडे शिकवताना मात्र ते कला माध्यमात अभ्यासक्रम म्हणून घालायचे हा देखील दिशाभूल करणारा प्रकार आहे. समाजातील ज्योतिष विषयक गैरसमज दूर करणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असताना, ज्या विद्यापिठाच्या माध्यमातून ज्ञान मोकळे केले गेले त्या मुक्तविज्ञापीठाने असा अभ्यासक्रम सुरु करणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे असे देखील नमूद केले आहे.




