सी व्होटर सर्वेचा अहवाल शिंदे- फडणवीस गटातील तणाव वाढीचं कारण बनू शकतो?
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
देश पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूकीला सामोरा जाणार आहे. यानंतर काही महिन्यातच महाराष्ट्र विधानसभेच्या ही निवडणूका पार पडतील. बिहारात यादव कुमारांची युती आणि राज्यातलं शिंदे फडणवीस सरकार मोठं सत्तानाट्य घडवून सत्तेवर आलं आहे. बिहार सत्तांतरणाचे पडसाद केंद्रिय निवडणूकीच्या निकालांवर पडतील का? असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी आता फक्त एक वर्ष उरलं आहे. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. भाजपही (BJP) मिशन मोडवर काम करतं आहे. गेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपने पुन्हा विक्रमी आकड्यांनी जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. देशभरात पुढील सार्वत्रिक निवडणुकीची चर्चाही जोर धरू लागली आहे. अशा स्थितीत आज निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाचा प्रभाव जास्त असेल? हा प्रश्नही चर्चिला जातो आहेच. याबाबत एका सर्वेक्षणाचे निष्कर्ष समोर आले आहेत.
या राज्यात वाढतील भाजपच्या जागा
भाजपच्या नेतृत्वा खालील एनडीएला कोणत्या राज्यात आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडीला कोणत्या राज्यात सत्ता मिळेल हे सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. इंडिया टुडे सी व्होटर सर्व्हेने ‘मूड ऑफ कंट्री’ नावाने हे सर्वेक्षण केले आहे. एका वृत्त वाहिनीवर प्रसारित झालेल्या सर्वेक्षणाच्या निकालावरून असं दिसून आले आहे की आज निवडणुका झाल्या तर देशात पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल, म्हणजेच भाजप पुन्हा सत्तेवर येईल. सोबतच विधानसभांचा विचार केला तर आसाममध्ये १२, तेलंगणात ६ जागा, पश्चिम बंगालमध्ये २० जागा, उत्तर प्रदेशात ७० जागा मिळणार असल्याचं सांगितलं जातं आहे. तर लोकसभेच्या विजयी जागांचा विचार केला तर आसाममध्ये एनडीएला १२ जागा मिळू शकतात, २०१९ लोकसभा निवडणुकीत इथं फक्त ९ जागा मिळाल्या. आसाममध्ये लोकसभेच्या एकूण १३ जागा आहेत. सर्वेक्षणानुसार एनडीएला येथे २ जागांचा फायदा होणार असल्याचं दिसतं. तेलंगणातही एनडीएला फायदा होणार असल्याचं बोललं जातं आहे. तिथं भाजपला ६ जागा मिळू शकतात, २०१९ लोकसभा निवडणूकीत तेलंगणात भाजपला फक्त २ लोकसभेच्या जागा मिळाल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये २०१९ लोकसभा निवडणुकीत टीएमसीला २२ तर एनडीएला १८ जागा मिळाल्या होत्या. सर्वेक्षणानुसार, आज निवडणूक झाली तर एनडीएला येथे २० जागा मिळू शकतात, म्हणजेच २ जागांचा फायदा होईल. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. आज निवडणुका झाल्या तर येथे एनडीएला ६ जागांचा फायदा दाखवण्यात आला आहे, म्हणजेच ७० जागा भाजपच्या पारड्यात पडू शकतात. २०१९ मध्ये एनडीएला येथे ६४ जागा मिळाल्या होत्या. २०१४ च्या निवडणुकीत एनडीओला येथे ७३ जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी ७१ भाजपच्या होत्या.
कॉंग्रेसच्या युपीएला या राज्यात होणार फायदा.
सी व्होटर सर्वेनूसार आज पुढील राज्यांमध्ये निवडणुका झाल्या तर कॉंग्रेसप्रणित युपीए आघाडीला फायदा होऊ शकतो. यात सर्वाधिक जागांचा फायदा महाराष्ट्रात होणार आहे. इथं युपीएच्या जी राज्यात महाविकास आघाडी आहे तिथं ३४ जागा वाढू शकतात. कर्नाटकात १७, बिहारात २५ जागांची भर युपीएला पडणार आहे. शिवाय आज निवडणुका झाल्या तर यूपीएला कर्नाटकात १५ जागा मिळतील. २०१९ मध्ये इथं फक्त २ जागा मिळाल्या, कर्नाटकात लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत. युपीएला महाराष्ट्रात २८ जागा मिळू शकतात. २०१९ मध्ये येथे फक्त ६ जागा मिळाल्या. त्याचवेळी, या आघाडीला बिहारमध्ये २५ जागा मिळाल्याचे दाखवण्यात आले आहे, तर २०१९ मध्ये काँग्रेसला येथे फक्त १ जागा मिळाली होती.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागला?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एकट्याने ३०३जागा जिंकल्या होत्या. एनडीएला ३५३जागा मिळाल्या. भाजपच्या मतांचा वाटा ३७.३६% होता, तर NDAचा एकत्रित मतांचा वाटा ४५% होता. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ५२जागा जिंकल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने ९२जागा जिंकल्या. ९७जागा इतर पक्ष आणि त्यांच्या आघाडीच्या खात्यात गेल्या.
राज्यात भाजपला मोठा फटका बसणार?
मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणात यूपीएला 48 पैकी 34 जागा मिळतील असे म्हटले आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला फक्त १४ जागांवर समाधान मानावे लागेल. या सर्वेक्षणामुळे शिंदे सरकार आणि भाजपमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणात एकूण १ लाख ४० हजार ९१७ लोकांनी सहभाग घेतला होता. देशात आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर कोणाचे सरकार येणार, या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान मोदी सरकारबाबतही प्रश्न विचारण्यात आले. सर्वेक्षणानुसार देशात पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. मोदी सरकार गेल्या ९वर्षांपासून सत्तेत आहे आणि ६७ % लोकांनी त्यांचे काम योग्य असल्याचे म्हटले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. तर त्यांच्यासोबत लढलेल्या शिवसेनेने १८ जागा जिंकल्या. अशा प्रकारे एनडीएने एकूण ४१ जागा जिंकल्या होत्या. मात्र, मूड ऑफ नेशनच्या सर्वेक्षणानुसार यावेळी एनडीए थेट ४१ वरुन १४ जागांवर घसणार आहे. २०१९ मध्ये राष्ट्रवादीला ४ तर काँग्रेसला १ जागा मिळाली. यावेळीही महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) एकत्रित आकडा ३४ पर्यंत जाऊ शकतो. ठाकरे गटाची शिवसेना (Shiv Sena) कॉंग्रेस (Congress) राष्ट्रवादीसोबत (NCP) असल्यामुळं हा चमत्कार साधला जाणार असल्याची चर्चा आहे.
लेखन – मोहन देशमुख
Disclaimer : सदरील माहिती पुस्तकं, वर्तमानपत्रं, इंटनेटवरील स्त्रोतांमधून संकलीत केलेली आहे. यात आम्ही सत्यतेचा दावा करत नाही.



