धक्कादायक -नाशिक शहरातील एकाच कुटुंबातील तिघांनी घेतला गळफास!
शहरातील सातपूर येथील राधाकृष्णनगरात राहणाऱ्या फळ विक्रेत्याने दोन युवा मुलांसह घरातील तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास घेतला.
मुक्ताराम बागुल – झूम मराठी
नाशिक शहरातील सातपूर येथील राधाकृष्णनगरात राहणाऱ्या फळ विक्रेत्याने दोन युवा मुलांसह घरातील तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास घेतला. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेने परिसर हादरला असून आर्थिक विवंचनेमुळे हे पाऊल उचलण्यात आले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक सुपडू शिरोडे (५५) प्रसाद दीपक शिरोडे (२५) व राकेश दीपक शिरोडे (२३) असे आत्महत्या केलेल्यांची नावे असून ते राधाकृष्णनगरमधील धनाई पुनाई रो हाऊसमध्ये राहत होते. तसेच हे तिघे जण अशोकनगर भाजी बाजारजवळ फळांच्या विक्रीचा व्यवसाय (Business) करत होते. मात्र, आज दुपारच्या सुमारास त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.
दरम्यान,घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे (Satpur Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण व सतीश घोटेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital) पुढील तपासणीसाठी पाठवले.



