चाळीसगाव भूमी अभिलेख कार्यालयाला आमदार मंगेश चव्हाण यांची अचानक भेट,नागरिकांना फिरविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची घेतली हजेरी
समस्यांचा आलेख वाढलेल्या चाळीसगाव भूमी अभिलेख कार्यालयाला आमदार मंगेश चव्हाण यांची अचानक भेट, मोजणी शीट,उतारे,दाखले,नकला आदी कामांसाठी अनेक महिने नागरिकांना फिरविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची घेतली “हजेरी”,
चाळीसगाव – जमीन मोजणी व जमिनी संदर्भातील अन्य कामांमध्ये भूमि अभिलेखचे अधिकारी व कर्मचारी कुचराई करत असल्याच्या तक्रारी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. याविषयी वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनसुद्धा कामकाजात सुधारणा होत नसल्याने संतप्त झालेल्या आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आज थेट या चाळीसगाव शहरातील भूमी अभिलेख कार्यालय गाठून अक्षरश: झाडाझडती घेतली.
त्याठिकाणी आलेल्या चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागातील अर्जदारांनी आपल्या समस्यांचा पाढा आमदार मंगेश चव्हाण यांच्यापुढे वाचून दाखवला. येत्या सात दिवसात कामकाजात सुधारणा न झाल्यास याद राखा असा सज्जड दम देखील त्यांनी दिला. या प्रकरणी आपण अँटी करप्शनमध्ये तक्रार करणार असून नागरिकांनी कोणत्याही शासकीय कार्यालयात एक पैसाही देऊ नका असे आवाहन त्यांनी केले आहे.हजेरी बुक मध्ये नोंद नाही, हालचाल रजिस्टर गायब.
चाळीसगाव शहरात कार्यरत असणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयात एकूण २७ कर्मचारी आहेत. त्यापैकी काही पदे रिक्त आहेत. आमदार मंगेश चव्हाण कार्यालयात आल्याचे कळताच कार्यालयात हजर नसलेले कार्यालयाचे उप अधिक्षक भोये तातडीने हजर झाले. त्यांच्याकडे आमदार चव्हाण यांनी हालचाल रजिस्टर मागितले असता ते मिळून आले नाही तसेच हजेरी बुक मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बहुतांश कर्मचाऱ्यांची हजेरी आढळून आली नाही. काही कर्मचाऱ्यांना आमदार मंगेश चव्हाण यांनी फोन करून ते कुठे आहेत याविषयी खात्री केली असता त्यांनी दिलेल्या उत्तरांमध्ये तफावत आढळून आली.


