आरोग्य व शिक्षण

मासिक पाळी, एक सामाजिक प्रश्न – पैगंबर शेख

मासिक पाळी, एक सामाजिक प्रश्न – पैगंबर शेख

मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा सॅनेटरी नॅपकिन माझ्या बायकोला आणून दिले. पण माझ्या बहिणीला किंवा आईला ते आणून देऊ शकलो नाही. बहिणीचे आणि माझे बरेच मैत्रीपूर्ण संबंध होते. पण कधीही असा प्रसंग आल्याचं लक्षातच नाही. पण बायकोच्या बाबत तसले कुठलेही संकोच मी कधीही बाळगले नाही. 

मुळात या विषयात महिला आणि पुरुष एकमेकांशी बोलण्यात बराच संकोच बाळगतात. पण यावर ज्ञान म्हणून उघडपणाने बोलायला हवे. कारण ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि त्याकडे त्याच पद्धतीने पाहायला हवे.

मी नेहमी म्हणतो स्त्रियांचे प्रश्न स्त्रियांनी मांडायला हवेत. स्त्रियांनी काय परिधान करावे ? काय नाही ? किंवा स्त्रियांनी कसे वागावे कसे नाही. याबाबत पुरुषांच्याच जास्त अपेक्षा आणि पुरुषच जास्त व्यक्त होतात. ज्या स्त्रिया या मुद्द्यावर बोलतात त्यातही पुरुषांचेच जास्त समर्थन किंवा विरोध असतो. स्त्रिया याबाबत जास्त व्यक्त होताना दिसत नाहीत. 

मासिक पाळीच्या काळात स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेऊ नये. हा मुद्दा एक पुरुष म्हणून मला पूर्णपणे मान्य आहे. कारण मी त्या क्रियेचा भाग आहे. परंतु मासिक पाळीत स्त्रिया अपवित्र असतात, नापाक असतात. हे विचार स्त्रियांनी नाकारून टाकले आहेत. हे स्वागतार्ह आहे. हा निर्णय स्त्रियांनी स्वतः घेतला आहे. त्या अपवित्र आहेत की नाही हे ठरवणारे आपण कोण ? पुरुषांवर असा कुठेही कशाही पद्धतीचा दबाव दिला गेला नसल्याने त्यांना याबद्दलचा उपेक्षितपणा हवा तेवढा समजून घेता येणार नाही. अगदी मलाही. पण थोड्या भावना समजून मी तो मांडण्याचा प्रयत्न करतोय. 

या सर्व गोष्टीत प्रबोधन महत्वाचे आहे. मासिक पाळीत किचन मध्ये प्रवेश नाही. या गोष्टी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी कधीही पाहिल्या नाही किंवा अनुभवल्या देखील नाही. प्रत्येक मासिक पाळीच्या काळात स्त्रियांच्या हार्मोन्स मध्ये बदल होतो. या काळात स्त्रियांना आरामाची गरज असते. बहुदा याकारणे स्त्रियांना याकाळात घरातच विलगिकरण करून ठेवले जात असे. परंतु २१ व्या शतकात स्त्रियांवर घराच्या आतली आणि कमावण्याची दोन्हीही जबाबदाऱ्या पडल्याने या व्यवस्थेला बराच फाटा दिला गेला. आणि या गोष्टी शहरात सध्यातरी निमित्तमात्र राहिल्या आहेत. 

माणसाची लाईफ स्टाईल कुठलाही धर्म ग्रंथ आल्यापासून बऱ्याच बदलल्या आहेत. माणूस घोड्यावरून आता गाडीवर आलाय. आणि विमानात सुद्धा बसलाय. माणसाची कुडाची, मातीची घरे आता सिमेंट आणि स्लॅब ची झाली आहेत. कबुतरांची जागा आता मोबाईल ने घेतली आहे. अमेरिकेतला माणूस चाळीत बसून पाहता येतो. ऑनलाइन दर्शन घेता येत आहे. या सगळ्या गोष्टींचा मानवी रहाणीमानावर बराच प्रभाव पडला आहे. आय रिपीट मानवी रहाणीमानावर बराच प्रभाव पडला आहे. त्यावर वेगळं लिहिलंच. पण काही समज आणि धार्मिकतेच्या नावावर चालवलेल्या परंपरा या तशाच चालू आहेत. त्याही आता बदलल्या पाहिजेत.

मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्या काळात स्त्रीला काय हवंय काय नाही या गोष्टीवर स्त्रियांनी बोललं पाहिजे. एक पुरुष म्हणून माझं त्याला नेहमीच अनुमोदन असेल. 

 -पैगंबर शेख

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे