सध्या एस्कलेटर म्हणजेच सरकते जिने सर्रास पाहायला मिळतात. पूर्वी जेव्हा एस्कलेटर भारतात दाखल झाले तेव्हा एखादी जादू बघावी तसे लोक या जिन्यांकडे पाहायचे. त्यावर पाय टाकताना गोंधळून कित्येकांचं कंबरडं मोडलं असेल याची गणतीच नाही.
पण आता आपल्याला या जिन्यांची हळूहळू सवय होऊ लागली आहे. ७-८ वर्षाचं चिमुरडं पोर अगदी सहज एस्कलेटरवर पाय टाकून युद्ध जिंकल्याचा अविर्भाव चेहऱ्यावर आणतं…!
एस्कलेटर मनुष्य प्राण्याच्या वेगवान जीवाला अधिक वेग देण्यासाठी बनवलं गेलं, असं एस्कलेटरच्या निर्मात्यांच म्हणणं!पण आपल्याकडे अगदी उलट घडतं.
माणसं एस्कलेटरवर इतकी ढम्मपणे उभी असतात की जोवर एस्कलेटर शेवटच्या पायरीपर्यंत जात नाही तोवर त्यावरून हलत नाही.
परिणामी ज्या माणसाला घाई असते तो ताटकळत मागेच उभा राहतो. कारण एस्कलेटरवरून धावणं आपल्याकडे वर्ज्य आहे, नाही का?
समजा आम्ही तुम्हाला सांगितलं, की एस्कलेटरवर कुठेही मख्खासारखं उभं रहाणं चुकीचं आहे – तर?हो हे खरं आहे. जेव्हा एस्कलेटरची निर्मिती झाली तेव्हा त्याचा मूळ उद्देश होता, लोकांना जास्त मेहनत करायला नं लावता त्यांना एका ठिकाणाहून खाली आणणे किंवा एका ठिकाणाहून वर नेणे.
त्यामुळे एस्कलेटर वापरण्याची मूळ पद्धत अशी सांगितली होती, की ‘ज्या लोकांना आरामात जायचे आहे त्यांनी एस्कलेटरच्या एका बाजूला उभे रहावे. जेणेकरून ज्या माणसाला घाई आहे तो एस्कलेटरच्या दुसऱ्या बाजूकडून धावत जात लवकरात लवकर पोचू शकेल.’
आपल्याकडे मात्र डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला लोक आरामात उभे असतात. त्यांचं काही बिघडत नाही पण मागच्याला ‘मुका मार’ बसतो त्याचं काय??
आता अनेक देशांत पोस्टरच्या पद्धतीने लोकांना एस्कलेटरची मूळ पद्धत सांगून योग्य रीतीने एस्कलेटरचा वापर कण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. आपल्याकडे देखील लोकांना मूळ पद्धत सांगण्याची नितांत गरज आहे.
लेखक – विशाल दळवी
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा