Heavy Rain – पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊसाचा अंदाज..
राज्यात ठिकठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसामुळे (Heavy rain) शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र अवकाळीसंकट अजूनही कायम आहे. पुढील चार दिवसांत राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत तर हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला.
श्रीलंकेपासून विदर्भापर्यंत कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. पुन्हा पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. हे पाहता राज्यात धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.
काही जिल्ह्यांत मेघ गर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यात मुंबईसह कोकण पट्ट्याचा समावेश आहे.नाशिक, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ, जळगाव, अहमदनगर, पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल,अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.



