” ते ” सगळे उध्दवग्रस्त का?
भारदस्त व्यक्तिमत्त्व नाही,लोकांना पेटवून टाकेल असं वक्तृत्व नाही, राजकीय डावपेच नाही..
त्यांच्या वैयक्तिक विरोधक तर त्यांना कमजोर नेतृत्व, अकार्यक्षम नेता (म्हणजे घरातून बाहेर न पडणारा) असं बरेच काही! एकूणच लायकी नसलेला असंच अप्रत्यक्ष त्याना म्हणायचं असेल.
सतरा वर्षे झाली पक्ष सोडून,स्वतःचा पक्ष काढला, तर काहींनी अनेक पक्ष बदलले, आता केंद्रात मंत्री आहेत. पण ज्या व्यक्तीमध्ये काहीच गुणवत्ता नाही असे ते जाहीरपणे सांगतात, ज्यांचा पक्ष, चिन्ह सगळे काढून घेतले, त्यांच्या करिश्माई वडिलांची प्रतिमासुद्धा घेतली…!
त्या उध्दव ठाकरे यांच्या नावाचा गजर केल्याशिवाय यांचे भाषणच संपत नाही..पण मान्य करत नाहीत की उध्दव ठाकरे नेतृत्व आहे! शिवसेनाप्रमुख यांची कारकीर्द असताना जेव्हढे आमदार शिवसेनेचे निवडून येत असत, त्यापेक्षा अधिक शिवसेनेचे आमदार उध्दव ठाकरे पक्षप्रमुख झाले त्या कार्यकाळात निवडून आले हे विसरून कसं चालेल?
पक्ष, चिन्ह सगळे काढून घेऊन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावाने मशाल या चिन्हावर विलेपार्लेच्या निवडणुकीत स्वतःचा उमेदवार निवडून आणला,विरोधक उमेदवार देऊ शकले नाही हे कसं विसरून चालेल?
उद्धव ठाकरे यांची रणनीती अशी असते की, समोरचा जिंकला असे वाटत असतानाच उद्धव ठाकरे यांनी शांतपणे प्रतिस्पर्धी व्यक्तीचा बाजार उठवलेला असतो! खूप सावकाशपणे आणि थंड डोक्याने खेळतात! बंडखोरी होणार त्याना माहिती होते, पण त्यानी रोजच दुखणे जवळ ठेवण्यापेक्षा,बंडखोरांना नकारात्मक भूमिकेत जाऊ दिले, नायक वाटणारे आमदार हळूहळू खलनायक या प्रतिमेत कधी गेले हे बंडखोरांना कळलंच नाही..
आज एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस आमदार नऊ महिने झाले तरी आम्ही का फूटलो हेच सांगत आहेत.. उद्धव ठाकरे यांचा सापळा असाच असतो…! केंद्रीय चाणक्य असो की राज्यातील चाणक्य हेसुद्धा उध्दव ठाकरे यांच्या नावाने चिडचिड करतात ते उगीचच नाही, तेंव्हा उध्दव ठाकरे समजून घेताना, त्यांच्या विरोधकांनी एक गोष्ट मान्य करावी , ते एक नेतृत्व आहे..! मग विरोधकांना लढत जरा सोप्पी जाईल!नाहीतर सतरा वर्षांनी सुद्धा उध्दवग्रस्त राहावे लागते..!
- सुरेश भट यांच्या काही ओळी…
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे…
मी मात्र थांबून पाहतो मागे कितीजण राहिले.!
अँड मनोज वैद्य.



