चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वेच्या आता 11 एप्रिलपासून आणखी दोन फेऱ्या
11 एप्रिलपासून मेमूच्या नेहमीप्रमाणे दिवसभरात चार फेऱ्या होतील
झूम मराठी
चाळीसगाव : पॅसेंजर ट्रेनमधून रूपांतरीत झालेली चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेन तब्बल दोन वर्षांनी 13 डिसेंबर 2021 रोजी रुळावरून धावली होती. मात्र, दिवसभरातून केवळ दोनच फेऱ्या होत असल्याने प्रवाशांचे हाल होत असत. आता राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने 11 एप्रिलपासून मेमू ट्रेन पूर्ण क्षमतेने धावणार आहे. मेमू ट्रेनच्या दिवसभरातून एकूण चार फेऱ्या होणार असल्याने प्रवाशांची त्रासातून मुक्तता होणार आहे.
मुंबई लोकलच्या धर्तीवर ही रेल्वे सुरू केल्याने नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळत आहेत. दरम्यान, एसटी कर्मचारी पाच महिन्यांपासून संपावर गेले आहेत. त्यात खासगी वाहनधारकांची मनमानी व मेमू ट्रेनच्या दोनच फेऱ्यांमुळे प्रवाशांचे हाल होत होते. त्यामुळे चार फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. यासाठी विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलनाचा इशाराही दिला होता.
कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्याने मेमू ट्रेनही पूर्ण क्षमतेने धावणार आहे. 11 एप्रिलपासून मेमूच्या नेहमीप्रमाणे दिवसभरात चार फेऱ्या होतील. चाळीसगाव येथून सकाळी 6.30 व 9.50 वाजता तसेच दुपारी 1.40 व सायंकाळी 5.30 या वेळेत ही मेमू ट्रेन धुळ्याकडे रवाना होईल.


