कृषीवार्तादेश-विदेशमहाराष्ट्र
अचानक खाद्यतेल एवढे महाग कां झाले?
कोरोनाची महामारी सुरु असतांना काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे एक-एक समस्या डोके वर काढू लागली आणि समस्या निर्माण झाल्यावर लोक त्याच्या मुळाकडे शोध घेवू लागले.
करोनामुळे आपली आरोग्य यंत्रणा,शैक्षणिक यंत्रणा किती कुचकामी आहे ते लोकांना समजले या देशात आम्ही ७४ वर्षात देशातील प्रत्येकास पुरेल अशी आरोग्य यंत्रणा आपण उभी करू शकलो नाहीत.देशातील १३५ कोटीपैकी ५ कोटी लोक जरी एकास वेळेस आजारी पडलेत तर त्यांना देखिल आपण आरोग्य सुविधा पुरवू शकत नाहीत. ना त्यांना पुरतील एवढे हॉस्पीटल आपल्याकडे आहेत ना त्यांना पुरतील एवढे आरोग्य कर्मचारी आपल्याकडे आहेत.७४ वर्षामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यात एक तरी ऑक्सिजन निर्मीतीचा प्लॉंट आपण उभा करू शकलोत कां? ‘जेंव्हा तहान लागते तेव्हांच विहीर खोदण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे’ आपण संकट आल्यावर धावाधाव करतो.शैक्षणिक क्षेत्राचं देखिल तसंच जर मुलं शाळेत काही अपरीहार्य कारणामुळे येवू शकले नाहीत तर पर्यायी शैक्षणिक यंत्रणेचा आपण कधी विचारचं केला नाही.तशी वेळ आल्यावर आपली काय फजिती झाली? हे सर्वजण आपण उघड्या डोळ्यांनी पहात आहोत.आजही आमच्याकडे १५-२० लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सोय न होवू शकल्याने परीक्षाच रद्द करण्याची नामुश्की ओढवते. या सारखे दुसरं दुर्दैव नेमकं काय असू शकतं. कोरोना यायच्या अगोदर आम्ही विद्यार्थ्यांना आपला देश आज जगातली महासत्ता होण्याकडे मार्गक्रमण करत आहे असे विद्यार्थ्यांना शिकवत होतो.आज तेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होवून विचारत आहेत सर, तुम्ही सांगायचे तीच कां ही महासत्ता?असा प्रश्न केविलवाण्या चेहर्याने विचारत आहेत.आज त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही.

त्यातल्यात्यात महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे.पेट्रोल आणि खतांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य लोकांनीं विचारल्यावर आपल्याकडे एकच उत्तर की,आपण पेट्रोल व रासायणिक खतांच्या बाबतीत इतर देशांवर अंवलंबून आहोत म्हणून जागतिक महामारीमुळे उत्पादक देशांनी कीमती वाढवल्यामुळे पेट्रोल आणि खतांच्या किमती वाढवणे सहाजिकच आहे तेही आपण समजू शकतो.

पण या काही महीन्यात गोडेतेलाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यात तेंव्हा लोक विचारतात आमच्या भूईमूग,सोयाबिन,मोहरी,सुर्यफुल इ.तेलबियांच्या कीमती फारशा वाढलेल्या नसतांना खाद्यतेलाच्या कीमती एवढ्या वाढल्या कशा?असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावू लागला. त्यांचा प्रश्न योग्यच आहे कारण पेट्रोल व खतांशी गरीबातल्या गरीब माणसाचा संबंध येत नाही.पण खाद्य तेला शिवाय कोणीच राहू शकत नाही.दररोजचा स्वयंपाक खाद्यतेलाशिवाय होवूच शकत नाही.कोणी कमी वापरेल कोणी जास्त वापरेल फरक एवढाच पण खाद्य तेल आवश्यकच आहे आणि ते खाद्यतेल महागल्याने गरीबांनी जगावं कसं?असा प्रश्न भेडसावू लागला.कां भिडल्या खाद्य तेलाच्या किमती गगनाला?कोण देईल कां याच उत्तर? पण त्याच समर्पक उत्तर कोणाकडेच नाही.पण त्याचंही सत्य लोकांपुढे आलचं पाहीजे.

त्याच उत्तर शोधतांना मी आपणास एक उदाहरण देतो.आज आपण कोणत्याही तेल घाण्यावाल्याकडे गेलोत तर त्याचं उत्तर ताबडतोड मिळेल.तेल घाण्यावाल्यास विचारा एक किलो तेल मिळवण्यासाठी किती तेलबिया वापराव्या लागतील? तो घाणावाला आपल्याला लगेच सांगेल की,कमीतकमी अडीच किलो.त्याच्या या उत्तरातच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत.आता शेंगदाण्याचा भाव आपल्याकडे १०० रुपया होता तेंव्हा शेंगदाणा तेल १५० रूपये किलो बाजारात विकले जात होते. जर अडीच किलो शेंगदाण्याचे २.५०×१००= २५० रुपये अधिक तेल बनविण्याचा खर्च एका किलोला ४०-५०रूपये धरल्यास ३०० रुपये घाण्याचे तेल जागेवर पडत असतांना आपण तेंव्हा १५०रुपये किलोने बाजारातून घेत होतो. आपल्याला ३०० रूपये किलोचे तेल १५० रूपये किलोने कां मिळतय याचा विचार कधी कोणी केलाच नाही म्हणून गावागावात चालणारे घाणे बंद झाले.कारण त्यांना ३०० रुपये किलोच्या खाली परवडत नव्हतं आणि गिर्हाईकांना १५० रूपये किलोने तेल मिळत असल्याने घाण्यांकडे कोणी ढुंकत नव्हतं.नेमके बाजारात १५० रूपये किलोने तेल कां मिळत होते.तर खोलात गेल्यावर आपण तेलाबाबत अजूनही स्वयंपूर्ण नाहीत म्हणून आपण इतर देशांतून ‘पामतेल’ नावाचे तेल आयात करतो.मग हे आयात केलेल निकृष्ठ दर्जाचे ‘पामतेल’ एकदोन किलो शेंगदाणा,सुर्यफुल,सोयाबिन,मोहरी तेलात,१०-१२ किलो पामतेल मिसळून १४-१५ किलोचे डब्बे भरल्यामुळे ७०-८०रुपये किलोचे पामतेल मिसळल्यामुळे आपणास ते खाद्यतेल १२५-१५० रुपये किलोने सहज उपलब्ध होत असल्याने शुध्द घाण्याच्या महागड्या तेलाकडे आपण पाठ फिरवली.आज मात्र जागतिक बाजारपेठेत ‘पामतेल’ चे भाव वाढल्यामुळे पामतेल मिश्रीत शेंगदाणा खाद्यतेलाचे भाव २००-२५० रूपये किलो झालेत.

तुम्ही नित्कृष्ठ दर्जाचे पामतेल खाण्यापेक्षा शुध्द घाण्याचे तेल खाणे सुरू करा.तुम्ही महीण्याला जेवढे तेल वापरतात त्यापेक्षा फक्त निम्मे तेल दरमहा वापरा म्हणजे महिन्याला एक कुटूंब जर ५ किलो खाद्यतेल वापरत असेल तर १५० ×५= ७५० होतात तसे शुध्द घाण्याचे शेंगदाणा तेल जर वापरले तर ३००× २.५० = ७५० महिण्याला खर्च येईल व शुध्द तेल कमी वापरल्याने तुम्ही आजारीही पडणार नाहीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गावोगाव व्यवसाईकही तयार होतील आपला पैसा आपल्याच देशात राहील व खाद्य तेलाबाबत स्वयंपूर्ण झाल्याने आपला स्वाभिमान देखिल जागा होईल.तूझं आहे तुज पाशी पण जागा भुललाशी ह्या उक्तीप्रमाणे आपण आपल्या गावागावात,घराघरात तयार होणारे खाद्यतेल वापरायला सुरूवात करा त्यामुळे खेडीही स्वयंपूर्ण होतील हीच विनंती.

श्री.सुभाष मासुळे, उडाणे, धुळे
9420179155




