नववीत राणा – अरविंद सावंतानी धमकी दिली, सावंतांनी फेटाळले आरोप
महाराष्ट्रात कशी फिरतेस, ते पाहू...' अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप खासदार नवनीत राणांनी केलाय. तर अरविंद सावंत यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी संसदेच्या लॉबीमध्ये आपल्याला धमकावल्याचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठलेल्या पत्रात म्हटलंय.
नवनीत राणांनी काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी केली होती. सचिन वाझे प्रकरण आणि त्याही आधी अनेकदा त्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

- ‘खंडणी प्रकरणात उद्धव ठाकरेंचा हात,’ नवनीत राणा यांचा आरोप
- परमबीर सिंह-अनिल देशमुख प्रकरणात काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे का?
“तू महाराष्ट्रात कशी फिरतेस, ते पाहू….तुला जेलमध्ये टाकू…,” अशी धमकी अरविंद सावंत यांनी संसदेच्या लॉबीमध्ये आपल्याला दिल्याचं नवनीत राणांनी पत्रात म्हटलंय.
चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची, जीवे मारण्याची धमकी शिवसेनेच्या लेटरहेडवरच्या एका पत्राद्वारे आणि फोनवरूनही देण्यात आल्याचंही त्यांनी या पत्रात म्हटलंय
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी या सगळ्या गोष्टींचा इन्कार केलाय.
ते म्हणाले, “हे साफ खोटं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हा कधी सदनात येतो, तेव्हा त्या मला दादा – भैय्या हाक मारतात. मी त्यांना धमकावलं ही गोष्ट साफ खोटी आहे. उलट त्याच सगळ्यांना धमकावत असतात. तुम्ही जर पाहिलंत, जेव्हाही त्या सदनात बोलतात, विशेषतः महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल किंवा मुख्यमंत्र्यांबद्दल बोलतात, तेव्हा त्यांच्या शब्दांतून – बॉडी लँग्वेजमधून घृणा आणि तिरस्कार दिसतो. मी माझ्या आयुष्यात कधी कोणाला धमकावलेलं नाही, महिलेला धमकावण्याचा तर प्रश्नच नाही. मी शिवसैनिक आहे… महिलांना कसं धमकावीन?”
अरविंद सावंत पुढे म्हणाले, “आज जे घडल्याचं त्या सांगताहेत तर सदनात आज महाराष्ट्रातलं सरकार बरखास्त करावं यासाठी भाजपचे खासदार उभे रहात होते. त्यांना त्यासाठी परवानगीही दिली जात होती. म्हणून आम्ही सगळे वेलमध्ये उतरून घोषणा देत होतो. जाताना जर मी त्यांना धमकी दिली असेल, तर त्यासाठी मला थांबावं लागलं असतं. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्यांना विचारा…की मी त्यांना असं धमकावलं का. अशी भाषा मी वापरू शकतच नाही. उलट त्याच सदनात बोलताना उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन वैयक्तिक टीका करत असतात. लोक असे साफ खोटं बोलू शकतात, याचंच मला आश्चर्य वाटतंय.”
आपल्याला देण्यात आलेली धमकी हा माझ्यासोबतच देशातल्या सगळ्या महिलांचा अपमान असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी या पत्रात म्हटलंय.
लोकसभा अध्यक्षांसोबतच पंतप्रधान, गृहमंत्री, संसदीय कार्यमंत्री आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना नवनीत राणांनी हे तक्रारीचं पत्र पाठवलं आहे.



