पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणू; अजित पवारांना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शब्द.
पिंपरी-चिंचवड (उमेश पाटील) ओबीसी आरक्षणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. येत्या दोन आठवड्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर करण्याचा आदेश बुधवारी (ता.४ मे) सर्वोच्च न्यायालयाने देताच राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यातही पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. पिंपरी-चिंचवड मिशनला अधिक गती देण्यासाठी पक्षबांधणी जोरात सुरु केली असून या आठवड्यात शहर कार्यकारिणी जाहीर करणार आहेत.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणूक तयारीचा भाग म्हणून पिंपरी-चिंचवडसाठी नवीन शहराध्यक्ष, महिलाध्यक्ष, युवक अध्यक्ष आणि तीन कार्याध्यक्ष राष्ट्रवादीने दिल्यानंतर आता शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघालाही बुधवार (ता.४ मे) पक्षाने अध्यक्ष दिले. पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी अनुक्रमे शाम लांडे, पंकज भालेकर आणि विनोद नढे यांची नियुक्ती करण्यात आली. काल अजित पवार यांनी मुंबईत या नेमणुकीचे पत्र या तिघांना दिले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे उपस्थित होते.
तिघेही नवनियुक्त तरुण पदाधिकारी हे माजी नगरसेवक आहेत. गत पालिका सभागृहात ते होते. तिघांनीही पु्न्हा पालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार असल्याची प्रतिक्रिया या नियुक्तीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. पिंपरीत सध्या राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आहेत. तर भोसरी आणि चिंचवडमध्ये भाजपचे महेश लांडगे व लक्ष्मण जगताप आहेत. २०२४ ला तेथेही पक्षाचा आमदार होईल, यादृष्टीने प्रयत्न करू, असे भालेकर व लांडे यांनी सांगितले.
दरम्यान, काल गव्हाणे यांनी अजित पवारांना नवीन शहर कार्यकारिणीची यादी दिली. तिला मंजूरी मिळाल्यानंतर ती या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पक्षाला पुन्हा जुने दिवस प्राप्त करून देणार असल्याची प्रतिक्रिया नढे यांनी दिली. चिंचवडचा पुढील आमदार हा महाविकास आघाडीचा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता शंभर टक्के आणणार असल्याचे लांडे यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षात एवढा भ्रष्टाचार भाजपने केला आहे की येथील जनताच त्यांना आता घरचा रस्ता दाखवणार आहे. त्यांच्या कार्यकाळात कुठलेही विकास कामे झाली नाहीत. साधा पाण्याचाही प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. उलट तो आणखीनच गुंतागुंतीचा करून ठेवला. आमच्या काळात दररोज पाणीपुरवठा व्हायचा. मात्र त्यांनी दिवसाआड केला, असा हल्लाबोल त्यांनी केला.



